गेल्या काही दिवसांपासून लोकसभेची जागा काँग्रेसला सुटावी म्हणून ठाकरे गटाविरोधात वक्तव्य करणारे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी आज अखेर काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याबाबतच ट्विट देवरा यांनी केले असून आज ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट झाल्याने मिलिंद देवरा यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मिलिंद देवरा शिवसेनेत आले तर, शिंदे गट हा दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी आग्रही असू शकतो. मात्र, भाजपा हा मतदारसंघ सोडण्यास तयार नाही. यामुळे भाजपा आणि शिंदे गटात दक्षिण मुंबई मतदारसंघावरून संघर्ष होण्याची चिन्हे असल्याचे बोलले जात आहे. दक्षिण मुंबईच्या जागेवर भाजपा आणि शिंदे गट उभयतांनी दावा केल्यास एकाला माघार घ्यावी लागणार आहे.
काँग्रेस सोडत असल्याचे ट्विट जरी देवरा यांनी केलेले असले तरी त्यांनी कोणत्या पक्षात जाणार या राजकीय वाटचालीवर काहीही भाष्य केलेले नाही. ''आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप होत आहे. काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा दिला आहे. याचबरोबर माझ्या कुटुंबाचे पक्षाशी असलेले 55 वर्षांचे नाते संपवत आहे. मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्ता यांचा वर्षानुवर्षे अखंड पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे.'', असे ट्विट देवरा यांनी केले आहे.
दक्षिण मुंबईत भाजपाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर किंवा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. तसेच भाजपाकडून ठाकरे गटातील एका वरिष्ठ नेत्याला पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ठाकरे गटातील हा नेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजपा या दोघांच्याही संपर्कात असल्याची चर्चा आहे. यामुळे देवरा काँग्रेसमध्ये मतदारसंघ आपल्या वाट्याला यावा यासाठी जे लढत होते, तोच संघर्ष त्यांना शिवसेनेतही करावा लागणार आहे.