महाभारतामधील चिरंजीव अश्वत्थामा आपणाला ठावुक आहे. तसे शिवसेनेत चिरंजीव मिलिंद नार्वेकर आहेत. उद्धव यांच्या निकटच्या वर्तुळात अनेक आले-गेले; पण मिलिंद चिरंजीव आहेत. उद्धव ठाकरे जोपर्यंत पक्षप्रमुख होेते, तोपर्यंत मिलिंद हे त्यांची सावली होते. उद्धव मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना वेगवेगळ्या कामांकरिता शासकीय मिलिंद लाभले. म्हणजे अजोय मेहतांपासून सीताराम कुंटेंपर्यंत सारेच दिमतीला असल्याने मिलिंद बाजूला पडल्याची कुजबुज सुरू झाली. अनिल परब यांचे वर्चस्व वाढल्यामुळे तर मिलिंद यांचे सेनेतील अस्तित्व शून्य सावली दिवसासारखे भासू लागले. परब यांच्यावर आरोप झाले व आता ईडीची पिडा त्यांच्या मागे लागल्याने परब यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी वरचेवर दिसू नये, असा सल्ला दिला गेल्याने पटकन मिलिंद यांनी उद्धव यांची पुन्हा पाठ धरली. नक्षलवादाच्या समस्येवर दिल्लीत बैठक झाली त्याला मुख्यमंत्री, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक यांच्यासोबत हजर होते ते मिलिंद नार्वेकर. ब्लेझर परिधान केलेले, फायलींचा गठ्ठा सोबत बाळगलेले मिलिंद नजरेत भरले आणि चर्चा सुरू झाली. मिलिंद परत आलाय... मिलिंद यांची श्रीमंत तिरुपती बालाजी देवस्थानाच्या विश्वस्तपदी नियुक्ती करण्याकरिता उद्धव यांनी जगनमोहन रेड्डी यांना फोन लावला होता. तिरुपती बालाजी मिलिंद यांना पावला, अशी चर्चा लोक करीत आहेत.
मिलिंद परत आलाय; मुख्यमंत्री ठाकरेंसोबत पुन्हा दिसू लागलाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 6:23 AM