मुंबई - राज्याच्या राजकारणात सत्तांतर घडल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्रिपदाची धुरा देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावर आली. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. या निकालात संख्याबळ नसतानाही भाजपाचे उमेदवार निवडून आले. त्यानंतर निकालाच्या दुसऱ्यादिवशी एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाल्याची बातमी समोर आली.
गेल्या १० दिवसांच्या सत्तासंघर्षात शिवसेनेचे तब्बल ४० आमदार फुटून एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. राज्यात शिंदे आणि भाजपा यांनी एकत्र येत सत्तास्थापन केली. यानंतर राजभवनात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्याच रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी सागर बंगल्यावर जात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तेव्हा मिलिंद नार्वेकर हेदेखील फडणवीसांच्या भेटीला गेल्याची माहिती उघड झाली आहे.
खुद्द विधानसभेच्या सभागृहात राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे सहजपणे हे सांगून गेले. विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मुंडे उभे राहिले. तेव्हा राहुल नार्वेकर यांच्याऐवजी त्यांनी मिलिंद नार्वेकर यांचा उल्लेख केला. सभागृहातील सदस्यांनी त्यांची चूक लक्षात आणून दिली. मात्र तेव्हा विधानभवनाच्या लॉबीत आदित्य ठाकरे भेटले होते. त्यांनी मी जेव्हा फडणवीसांची भेट घेतली तेव्हा मिलिंद नार्वेकर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेल्याचं सांगितले. त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांनी ही भेट नेमकी कशासाठी घेतली याबाबत चर्चेला उधाण आलं आहे.
मिलिंद नार्वेकरही वेगळा विचार करण्याच्या तयारीत? शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हेदेखील फारसे सक्रीय नाहीत. अलीकडेच त्यांनी विधिमंडळ परिसरात एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचीही भेट घेतली होती. या भेटीने अनेकांच्या भूवया उंचावल्या.
शिवसेनेच्या ४० आमदारांचे बंडमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल ४० आमदार आहेत. शिंदे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेत दोन गट पडलेत. त्यात एक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा गट झाला आहे. त्यात १५ आमदार उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहेत. विधानसभेत झालेल्या विश्वासदर्शक ठरावावेळी एकनाथ शिंदे सरकारच्या बाजूने १६४ मते पडली. तर यात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने विरोधात मतदान केले. त्यामुळे आदित्य ठाकरे वगळता इतर १४ आमदारांना अपात्रतेची नोटीस शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून बजावण्यात आली आहे.