मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव असलेल्या मिलिंद नार्वेकर यांच्यावर ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी टीका केली आहे. जवळच्याच माणसांनी उद्धव ठाकरेंचा घात केला. ५० टक्के शिवसेना एकट्या मिलिंद नार्वेकर यांनी संपवली आणि ते उद्धव ठाकरे यांना कळलंच नाही, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे.
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना रामदास कदम यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यावर थेट निशाणा साधला. ते म्हणाले की, ५० टक्के शिवसेना ही मिलिंद नार्वेकर यांनी संपवली. उद्धव ठाकरेंना कळलंच नाही. कुठलीही व्यक्ती थेट उद्धव ठाकरेंना भेटली तर ते मिलिंद नार्वेकर यांना आवडत नसे. त्याचा काटा कसा काढायचा. त्याला पुन्हा उद्धव ठाकरेंना भेटू द्यायचं नाही, याचं व्यवस्थित प्लॅनिंग मिलिंद नार्वेकर करायचे, असा आरोप रामदास कदम यांनी केला.
तसेच उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांनीच त्यांचा घात केल्याचा दावा रामदास कदम यांनी केला. ते म्हणाले की, जवळच्याच माणसांनी उद्धव ठाकरेंचा घात केला. मग सुभाष देसाई असतील. मिलिंद नार्वेकर असतील, आणखी काही मंडळींची नावं मी पुढे घेणार आहे. उद्धवजींच्या सोबत राहून त्यांना अंधारात ठेवून त्यांनी पक्षाचं नुकसान केलं. निवडणुका आल्या की, पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांना भेटा. मिलिंद नार्वेकरांना भेटण्याआधी कुणी थेट पुढे गेला तर त्याचं तिकीट कापलं गेलं म्हणून समजायचं, हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. कुणी बोलत नाही. आता मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? बोललं तर संपला तो माणून, आमदार असेल तर तिकिट नाही, नगरसेवक असेल तर तिकिट नाही, अशी परिस्थिती होती, असा दावा रामदास कदम यांनी केला.
दरम्यान, मला आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत काही बोलायचं नाही आहे. मात्र महाराष्ट्राच्या जनतेमध्ये जो काही संभ्रम निर्माण झाला आहे, तो दूर करण्यासाठी काही गोष्टींचा खुलासा होणं आवश्यक आहे. मी आदित्य ठाकरेंना विचारतो की, शिवसेनाप्रमुख जिवंत असते तर त्य़ांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करू दिली असती का, शिवसेनाप्रमुख हयात असते तर त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होऊ दिले असते का? असा रोखठोक प्रश्न रामदास कदम यांनी विचारला.