दुधाला ३४ रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी अहमदनगरमधील अकोले येथे गेल्या सहा दिवसांपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांसह किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्र लिहून डॉ. अजित नवले व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी असे म्हटले आहे. तसेच, उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन देखील केले आहे. यासंदर्भात शरद पवार यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.
शरद पवार यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून दुधाच्या दराच्या प्रश्नांवर डॉ. अजित नवले व इतर कार्यकर्त्यांची बेमुदत उपोषण सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने दिनांक १४ जुलै २०२३ रोजी अध्यादेश काढून गाईच्या दूधाला किमान ३४ रुपये प्रति लिटर निश्चित करूनही सदर आदेशाचे पालन दूध संघांकडून होत नाही असे दिसते. या संदर्भात शासनाने तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. त्यासाठी दूध संघानेही सहकार्य करावे.
याचबरोबर, उपोषणकर्ते शेतकरी नेते डॉ. अजित नवले व त्यांच्या सहकाऱ्यांना आवाहन की त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, उपोषण मागे घ्यावे. शासनाबरोबर चर्चेतून आपण मार्ग काढू. दूध उत्पादक शेतकरी बांधवांना देखील विनंती की, त्यांनी दूधासारखा नाशवंत माल रस्त्यावर ओतून आणखी नुकसान करून घेऊ नये. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे कृपया लक्ष देऊन तातडीने दूध दरवाढीची अंमलबजावणी करून घ्यावी, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, दुधाला ३४ रुपये दर द्यावा, दुध संकलन केंद्राकडून शेतकऱ्यांची लूट थांबावी तसेच शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी आदी मागण्यांसाठी गेल्या सहा दिवसांपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांसह किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांचे उपोषण सुरु आहे. या उपोषणादरम्यान डॉ. अजित नवले यांची यांची प्रकृती ढासळली आहे. तरीही ते उपोषणावर ठाम आहेत. तसेच, आज उपोषणस्थळी शेतकऱ्यांनी शेकडो गाई आणल्या. त्यामुळे येथील तहसील कार्यालयाचा परिसर गायींनी भरुन गेला आहे.
अभिनेते मकरंद अनासपुरेंचा उपोषणकर्त्यांना पाठिंबाआज या आंदोलकांची अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी उपोषणस्थळी भेट घेतली. अनासपुरे यांनी दुधदर प्रश्नी उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला. ते म्हणाले शेतकऱ्यांच्या मागण्या या रास्त आहेत. त्या पूर्ण व्हाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही कायम आहोत असेही मकरंद अनासपुरे यांनी स्पष्ट केले.