मुंबई : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळनेही दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एक जुलैपासून ही दरवाढ लागू असणार आहेत. त्यामुळे मुंबई आणि पुणे शहरात मिळणारे गोकुळचे दूध महाग झाल्यामुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडणार आहे.
गायीच्या दुधात प्रति लिटर दोन रूपये दरवाढ करण्याचा निर्णय दूध संघाने घेतला आहे. ही दरवाढ फक्त मुंबई आणि पुण्यासाठी लागू असणार आहे. या पुढे मुंबई आणि पुण्यात गोकुळचे गायीचे दूध प्रतिलिटर ५४ रूपये ऐवजी ५६ रूपयांनी मिळेल, अशी माहिती गोकुळ संघाचे अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी दिली आहे.
दुधापासून बनणारे पदार्थ आणि दुधाची भूकटी यामध्ये मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे होणारा खर्च आणि तोटा याचा ताळमेळ बसवण्यासाठी गोकुळने दरवाढीचा निर्णय घेतल्याचे अरूण डोंगरे यांनी सांगितले. तसेच, राज्यातील इतरही दूध उत्पादक संघांनी दुधाच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे आता या सर्व गोष्टी लक्षात घेता गोकुळलाही दुधाच्या दरात वाढ करावी लागत आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, जून महिन्याच्या सुरुवातीला मदर डेअरीकडून दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपये वाढ करण्यात आली होती. तर अमूलने देखील आपल्या दूध दरात प्रति लिटर २ रुपयांनी वाढ केली होती. त्यानंतर कर्नाटक मिल्क फेडरेशनकडून नंदिनी या दुधाचे दर वाढवले होते. आता गोकुळने दुधाच्या दरात वाढ केली आहे.