पुणे : येत्या सोमवारपासून राज्यात दुधाच्या दरात वाढ करण्यात येणार असून लिटरमागे दोन रुपयांनी दूध वाढणार आहे. महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेने हा निर्णय घेतला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेची बैठक आज पुण्यात पार पडली. या बैठकीसाठी ६० संस्थांचे १५० प्रतिनिधी हजर होते. या सर्वांनी दूध खरेदी दरामध्ये वाढ झाल्याने विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही ब्रँडचे दूध घेतले तरी त्यात दोन रुपयांची दरवाढ होणार आहे.
महाराष्ट्र सरकारने दूध अनुदानाची रक्कम कमी करून फेब्रुवारी महिन्यात प्रति लिटरमागे ३ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दूध व्यावसायिकांना लिटरमागे दोन रुपयांचा तोटा सहन करावा लागत होता. त्यामुळे शासनाने अनुदानाची रक्कम ३ रुपयांवरून ५ रुपयांवर आणावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. अखेर शासनाच्यावतीने त्यावर काहीही कार्यवाही न झाल्याने त्याचा फटका ग्राहकांना बसणार आहे. त्यामुळे कोणत्याही ब्रँडचे दूध हे लिटरमागे दोन रुपयांनी महागणार असून येत्या सोमवारपासून ही भाववाढ राज्यात लागू होईल.