ऑनलाइन लोकमतउस्मानाबाद, दि. 11 - शेतक-यांच्या अनेक दिवसांच्या आंदोलनापुढे सरकार काहीसं झुकताना दिसत आहे. दुधाचे दर वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला अखेर यश आलं आहे. येत्या 3 दिवसांत दुधाचे दर वाढवणार असल्याची माहिती दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिली आहे.
दुधाच्या नव्या दरांनुसार सध्याचा 24 रुपये लिटरनं असणारा गाईच्या दुधाचा दर आता 27 रुपयांपर्यंत वाढणार असून, 33 रुपये लिटरनं मिळणारे म्हशीचे दूध आता 37 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. येत्या तीन दिवसात दुधाचे नवे दर लागू होणार आहेत. दूध संघांना हे नवे दर दूध उत्पादकांना देणं बंधनकारक असणार आहे. राज्य सरकारला शेतकऱ्यांची काळजी आहे. 13 तारखेला दुधाचे नवे दर घोषित करणार असून, शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करू. शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकार खंबीरपणे उभे राहील, असे राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर म्हणाले आहेत.शेतकऱ्यांसाठी दुधाचे दर वाढवले असले तरी सामान्य लोकांचाही सरकार विचार करत आहे. मध्यमवर्गीयांना त्रास होणार नाही, याची काळजी सरकार घेईल. मात्र बळीराजाला आधार देण्याच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत, असेही जानकर यावेळी म्हणाले.