सोलापूर : दूध व्यवसाय संपूर्णपणे खासगी संघाच्या ताब्यात गेल्याने गायीच्या दूध खरेदी दराचा सातत्याने चढउतार सुरू आहे. सातत्याने सुरू असलेल्या दराच्या प्रश्नावरून दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे राज्याचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात प्रतिलिटर ३० रुपये असलेला खरेदी दर ११ आॅक्टोबरपासून २७ रुपयांवर आला आहे.
राज्यात मागील दोन वर्षे दुधाचा महापूर झाला, असे सांगितले जात होते. एकीकडे अतिरिक्त दूध संकलन होत असल्याचे सांगितले जात असताना कर्नाटक फेडरेशन व गुजरातमधील अमुलच्या दुधाची विक्री महाराष्टÑात मोठ्या प्रमाणावर केली जात होती. शासनाचे दूध व्यवसायाबाबतचे धोरण व्यवस्थित नसल्याने बाहेरच्या राज्यातील दुधाची विक्री कमी दराने महाराष्टÑात होत होती. याचा परिणाम राज्यातील गायीचा दूध खरेदी दर १७ रुपये लिटर इतका खाली आला होता.
यामुळे राज्य शासनाने खरेदीवर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला व अनुदानही दिले. जुलैनंतर बाजारात दूध पावडरचे दर वाढल्याने दूध खरेदी दर वाढण्यास सुरुवात झाली. सप्टेंबर महिन्यात दूध खरेदी दर ३० रुपयांवर गेला होता. दरवाढीचे कारण दूध पावडरचे दर वाढल्याचे सांगितले जात होते. याच कालावधीत दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाची बैठक झाली. या बैठकीत समितीचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी दूध खरेदी दर सातत्याने कमी-अधिक करू नका, अशी मागणी केली.
कोल्हापूर भागातील संघ गायीच्या दुधाची खरेदी प्रतिलिटर २५ रुपयांनी करतात, तुम्ही मात्र सतत दर कमी-जास्त करता हे थांबले पाहिजे, असा मुद्दा मांडला. बैठकीत सोनाईचे अध्यक्ष दशरथ माने यांनी दर स्थिर ठेवण्याचा शब्द दिला; मात्र नंतर खरेदी दर वाढविला. ही बाब खटकल्याने विनायकराव पाटील यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतरही दूध खरेदी दराचा खेळ सुरूच आहे. दूध व्यवसाय पूर्णपणे खासगी व्यक्तीच्या ताब्यात गेल्याने सहकारी संघाचे काही चालत नाही, असे सांगण्यात आले.
अशी झाली दरवाढ..- गायीच्या अनुदानासह २५ रुपयांनी खरेदी होणाºया दुधाला जुलै १९ मध्ये प्रतिलिटर २६ रुपयांचा दर दिला होता. त्यानंतर २७ रुपये, २८ रुपये, २९ रुपये अशी दरवाढ करीत ११ सप्टेंबरपासून ३० रुपये दर करण्यात आला होता. च्हा दर सप्टेंबर महिन्यातच एक रुपयाने कमी करून २९ रुपये व एक आॅक्टोबरपासून २८ रुपये करण्यात आला होता. तोच दर ११ आॅक्टोबरपासून २७ रुपये करण्यात आला आहे.
गोकुळ, वारणा, कृष्णा व आमच्या भागातील संघ गायीचे दूध २५ रुपयांनी खरेदी करतात. मात्र सोलापूर, पुणे परिसरातील संघ दरात सतत बदल करतात. काही महिने तरी दर स्थिर ठेवण्याची माझी मागणी होती. परस्पर १० दिवसाला दूध खरेदी दर बदलत असल्याने मी राजीनामा दिला. - विनायकराव पाटील
अध्यक्ष, दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघ.दूध पावडरचे दर वाढल्याने गायीच्या दुधाचा खरेदी दर वाढविला होता. पावडरचे दर कमी झाल्यानंतर दूध खरेदी दर कमी करावा लागत आहे. सध्या प्रतिलिटर २७ रुपयांनी दूध खरेदी केली जात असली तरी संकलनात वाढ होत असल्याने आगामी कालावधीत २५ रुपये दर द्यावा लागणार आहे. - दशरथ मानेअध्यक्ष, सोनाई दूध इंदापूर