सोलापूर : कोरोना महामारीच्या काळात अडचणीत आलेला राज्यातील दूध व्यवसाय सावरू लागला असताना खासगी दूध संस्थांनी संघटितपणे दूध खरेदीदर कमी करण्याचा प्रयत्न करून उत्पादकांची गोची केली जात आहे. कोरोनाच्या अगोदर मार्चमध्ये गाईच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर ३० रुपयांवर गेला होता. मार्चच्या अखेरीस लाॅकडाऊनमुळे दूध विक्रीला मोठा फटका बसला. सप्टेंबरपासून परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने दुधाला मागणीही वाढली आहे. १७-१८ रुपयांवर आलेला दूध खरेदीदर सावरू लागला. शासनाने सहकारी दूध संघांकडून काही प्रमाणात खरेदी सुरू केली. मात्र संघ व खासगी दूध संघांना अनुदान योजनेचा फायदा मिळाला नाही. १८ रुपयांवर आलेला गाईच्या दुधाचा खरेदीदर सावरत सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात २५ रुपयांवर गेला होता. दर चांगला मिळू लागताच खासगी दूध संघांनी एकत्रित येत दूध खरेदीदर प्रति लिटर २२ रुपये इतका करण्याचा प्रयत्न केला.
राज्यात दररोज १.६० कोटी लिटर दूध संकलन राज्यात साधारण ४० सहकारी संघ तर पुणे विभागात २१ सहकारी दूध उत्पादक संघ आहेत. राज्यातही २६० खासगी दूध ब्रँड आहेत.
राज्यात खासगी संघ गाईचे दूध २३, २४ व २५ रुपयांनी खरेदी करीत आहेत. दूध दर चांगला सावरला आहे. पुणे विभागातच राज्याच्या तुलनेत ८० टक्के दूध संकलन होत आहे. - प्रकाश कुतवळ, ऊर्जा दूध, पुणे