लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : संप काळातील पहिल्या तीन दिवसांच्या तुलनेत रविवारी शहरात दूध पुरवठा काही प्रमाणात वाढला. त्यामुळे नागरिकांना पिशवी बंद दूध पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकले. शहरात सुमारे ७० ते ८० टक्के दुधाचा पुरवठा झाला. सोमवारी बंदच्या पार्श्वभूमीवर दूध कमी उपलब्ध होण्याची शक्यता असली तरी, त्याचा परिणाम मंगळवारी जाणवेल.पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (कात्रज) व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक क्षीरसागर म्हणाले की, संपाच्या पहिल्या दिवशी ५० टक्के दुधाचा पुरवठा झाला, तर दुसऱ्या दिवशी सरासरीच्या केवळ २५ टक्के दूध उपलब्ध झाले. शनिवारी संप मिटल्याची घोषणा झाल्यानंतर, त्यात वाढ होऊन ही उपलब्धता ७० टक्क्यांपर्यंत वाढली. रविवारीही त्यात वाढ होईल, अशी शक्यता होती; पण तेवढेच म्हणजे सुमारे १ लाख २५ हजार लिटर दुधाचा पुरवठा झाला. पहिल्या दोन दिवसांच्या तुलनेत हे प्रमाण चांगले राहिल्याने फारसा तुटवडा जाणवला नाही. पण सोमवारी बंदचा परिणाम होऊ शकतो. दूध पुरवठा कमी झाल्यास मंगळवारी दुधाची टंचाई जाणवू शकते.रविवारी सुमारे साडे तीन लाख दुधाचा पुरवठा झाला असून सोमवारीही तेवढेच दूध मागविण्यात आले आहे. सांगली भागात संपाचा फारसा परिणाम झाला नसल्याने दूध उपलब्ध होईल, असे दूध आणि मिठाई विक्रेते श्रीकृष्ण चितळे यांनी सांगितले. गणेश पेठ येथील दूधभट्टीत रविवारी दुधाची आवक सुमारे २ हजार लिटर झाली. शनिवारच्या तुलनेत त्यात ५०० ते ७०० रुपयांची घट झाली. मात्र, किरकोळ विक्रीमध्ये दुधाचे भाव शनिवारप्रमाणेच ७५ रुपयांपर्यंत गेले होते. सोमवारी बंदमुळे मागणी कमी राहण्याची शक्यता असून दुधाची आवकही कमी होवू शकते, असे दामोदर हिंगमिरे यांनी सांगितले.
दूध पुरवठा वाढला
By admin | Published: June 05, 2017 1:26 AM