नागपूर : दूध उत्पादक शेतकºयांच्या आंदोलनाला यश आले असून, राज्य सरकारने दुधाला प्रतिलीटर २५ रुपये दर देण्याची घोषणा गुरुवारी केली. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले आंदोलन लगेच मागे घेतले आहे. हा निर्णय २१ जुलैपासून लागू होणार असून, दूध संघांना आता शेतकºयांना २५ रुपये भाव द्यावा लागेल. दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी विधान परिषदेत तशी घोषणा केली.दूध उत्पादक शेतकºयांना प्रतिलीटर ५ रुपये थेट अनुदान द्यावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभरात ‘दूध बंद’ आंदोलन केले. त्याचा गुरुवारी चौथा दिवस होता. या काळात अनेक ठिकाणी दुधाचे टँकर रोखण्यात आले. मात्र मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये दूधटंचाई जाणवली नव्हती. या पार्श्वभूमीवर ‘स्वाभिमानी’चे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात तातडीची बैठक होऊन हा निर्णय घेण्यात आला.दिलेली वाढ समाधानकारकजलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी बोलताना मी तीन-चार पर्याय दिले होते. त्यातील एक पर्याय सरकारने आज स्वीकारला आहे. दूध उत्पादकांना सरकारने दिलेली वाढ समाधानकारक आहे. त्यामुळेच आम्ही आंदोलन मागे घेत आहोत. - राजू शेट्टी, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटनाअसे मिळेल अनुदान-दुधाला प्रति लिटर २५ रुपये दर शेतकºयांना देणे दूध संघांना बंधनकारक आहे. राज्य सरकार पाच रुपये दूध संघांना देईल आणि दूध संघांकडून ते शेतकºयांना मिळतील.याची अंमलबजावणी २१ जुलैपासून होईल. राज्य सरकार दूध संस्थाना दूध भुकटीसाठी प्रति क्विंटल ५० रुपये तसेच दूध निर्यातीसाठी ५ रुपयांचे अनुदान देते. जे दूध संघ २५ रुपये दर देणार नाहीत त्यांचे हे अनुदान रोखले जाणार आहे.
दुधाला मिळणार २५ रुपये दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 6:06 AM