मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरणी कामगारांच्या घरांची लॉटरी डिसेंबरपर्यंत काढण्याचे आश्वासन दिले होते. नवीन वर्ष उजाडले तरीही ही लॉटरी जाहीर झाली नसल्याने मुख्यमंत्र्यांचे आश्वासन केवळ घोषणाच ठरली आहे. म्हाडामार्फत लॉटरी काढण्याची तयारी सुरु असली तरी त्याची घोषणा झालेली नसल्याने दुसऱ्या टप्प्यातील लॉटरी लांबणीवर गेली आहे.बंद गिरण्याच्या जमिनीवर गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना घरे देण्याचानिर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार म्हाडामार्फत पहिल्या टप्प्यात बांधण्यात आलेल्या ६ हजार ९२५ घरांची सोडत २0१२ मध्ये काढण्यात आली. म्हाडामार्फत दुसऱ्या टप्प्यात ६ गिरण्यांच्या जमिनीवर ६ हजार ७९४ घरे उभारण्यात येत आहेत. तर तिसऱ्या टप्प्यांतर्गत १0 गिरण्यांच्या जमिनीवर २ हजार ९११ सदनिका बांधण्याचे प्रस्तावित आहे.म्हाडा अधिकारी हिवाळी अधिवेशनाच्या कामात असल्याने गिरणी कामगारांच्या घरांची लॉटरी लांबणीवर गेल्याचे बोलले जात आहे. अधिकाऱ्यांनी या लॉटरीची तयारी सुरु केली असून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे, अधिकाऱ्यांनी सांगितले.
गिरणी कामगारांची लॉटरी लांबणीवर
By admin | Published: January 01, 2016 2:23 AM