कोल्हापूर : मुंबईतील गिरणी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शनिवारी कोल्हापुरात सहकारमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संभाजीनगर येथील नाळे कॉलनीतील निवासस्थानावर काढण्यात येणारा मोर्चा मंत्री पाटील हे सोलापूर दौऱ्यावर असल्यामुळे रद्द करण्यात आला. सलग तीन वेळा पाटील यांनी हुलकावणी दिली असल्याची संतप्त प्रतिक्रिया गिरणी कामगारांकडून यावेळी उमटली. अखेर संभाजीनगर बसस्थानक येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.मुंंबईत गिरणी कामगारांना मोफत घरे द्या, कामगारांच्या मुलांना नोकऱ्या द्या, कामगारांना रेशन द्या, मालकाला कर बसवा, गिरणी कामगाराला मोफत घर द्या, आदी मागण्यांसाठी शनिवारी सर्व श्रमिक संघ, कोल्हापूर (गिरणी कामगार विभाग) यांच्यातर्फे संभाजीनगरातील चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यात येणार होता. परंतु पालकमंत्री सोलापूर दौऱ्यावर असल्यामुळे तो रद्द करण्यात आला.विधीमंडळ अधिवेशनानंतर म्हणजे ९ एप्रिलनंतर गिरणी कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊ, असे आश्वासन पालकमंत्री पाटील यांनी दिल्याची माहिती सर्व श्रमिक संघ कोल्हापूरचे अध्यक्ष अतुल दिघे यांनी दिली.संघटक दत्तात्रय अत्याळकर म्हणाले, २००५ पासून या न्याय्य मागण्यांसाठी लढा देत आहोत; पण तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यानंतर भाजप-शिवसेना युती सरकार सत्तेवर आले, तरीही अद्याप गिरणी कामगारांना न्याय मिळालेला नाही. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गिरणी कामगारांच्या मागण्यांबाबत शब्द पाळावा. (प्रतिनिधी)अधिवेशनात चर्चाही नाही...कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे ४० हजार गिरणी कामगार आहेत. सध्या विधीमंडळाचे अधिवेशन सुरू आहे; पण या अधिवेशनात अद्यापही गिरणी कामगारांच्या मागण्यांबाबत साधी चर्चाही झालेली नाही. ५ एप्रिलला होणाऱ्या मुंबईतील मोर्चात कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यातील सुमारे दोन लाख गिरणी कामगार सहभागी होणार आहेत.
गिरणी कामगारांचा मोर्चा रद्द
By admin | Published: March 27, 2016 1:22 AM