मुंबई : विरोधी बाकावर असताना गिरणी कामगारांच्या प्रश्नावर काँग्रेस राष्ट्रवादी सरकारला कोंडीत पकडणाऱ्या सरकारने सत्तेत आल्यानंतर वर्षभरात गिरणी कामगारांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे सरकारच्या वर्षपूर्ती दिनी गिरणी कामगार कृती संघटनेच्या वतीने शनिवारी मुंबईत १३ ठिकाणी काळे झेंडे दाखवून सरकाचा निषेध केला.गिरणी कामगार कृती संघटनेच्या वतीने शनिवारी भारतमाता, लालबाग-हिरामणी मार्केट, सरदार हॉटेल-परेल नाका, दादर अग्निशमन दल, नायगाव, वरळी नाका, सेंचुरी बाजार-प्रभादेवी, शिवडी नाका, किर्ती महल हॉटेल -परेल नाका, मफतलाल मिल-लोअर परेल आदी १३ ठिकाणी गिरणी कामगारांनी काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध केला. मुंबईबाहेर कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी ठिकाणच्या गिरणी कामगारांनी शनिवारी तहसीलदार कार्यालयावर मोर्चे काढले. आघाडी सरकारने गिरण्यांच्या जागेवर एक तृतीयांश जमीन घरबांधणीसाठी देण्याचा, तसेच एमएमआरडीएच्या तयार होणाऱ्या घरांपैकी ५0 टक्के घरे गिरणी कामगारांना देण्याचा कायदा केला आहे. त्याची सरकारने अंमलबजावणी करून कामगारांना त्यांचा हक्का द्यावा, म्हाडामार्फत बांधण्यात आलेल्या घरांची लॉटरी काढण्यात यावी, एमएमआरडीएच्या ११ हजार घरांच्या किंमती ठरवून त्वरित लॉटरी काढावी, अशा मागण्या केल्या.
गिरणी कामगारांनी केला सरकारचा निषेध
By admin | Published: November 01, 2015 1:57 AM