लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गिरणी कामगारांच्या सुमारे ३३ हजार २२३ घरांची योजना कागदावरच आहे. त्यामुळे अर्जदार गिरणी कामगारांना घरे मिळण्याच्या दृष्टीने शासनाने ठोस प्रस्ताव सादर केला नाही, तर पावसाळी अधिवेशनात २६ जुलै रोजी गिरणी कामगार आझाद मैदानावर धडकतील, असा इशारा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिला आहे. संघाचे सरचिटणीस गोविंद मोहिते यांच्या ६७व्या वाढदिवसानिमित्त शनिवारी मनोहर फाळके सभागृहात आयोजित कामगार मेळावा व कामगार प्रशिक्षण शिबिरादरम्यान ते बोलत होते. अहिर म्हणाले की, मुंबईतील गिरणी कामगार आपल्या हक्कांपासून वंचित राहता कामा नयेत. या भूमिकेला गोविंदराव मोहिते यांनी कृतीतून योग्य ती साथ दिली आहे. मात्र गिरणी कामगारांनीही संघाच्या पाठीशी एकजूट कायम ठेवली, तर यश मिळणे कठीण नाही. तरी गिरणी कामगारांचा हा लढा आता थांबता कामा नये. मोहिते यांनी अहिर यांच्या भूमिकेचे समर्थन करून २६ जुलैच्या आंदोलनाची घोषणा केली. मोहिते म्हणाले की, गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर गेल्याच आठवड्यात ६ कामगार संघटनांच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यात १ लाख १४ हजार कामगारांना घरे मिळण्याचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता आॅनलाइनद्वारे नव्याने अर्ज करण्याची संधी प्राप्त झाल्याने कामगारांच्या संख्येत आणखी वाढ होईल. मात्र केवळ नोंदणी न करता संबंधित कामगारांना घरे देण्यासाठी शासनाने योजना आखावी, अशी मागणीही मोहिते यांनी केली आहे.१ लाख १४ हजार कामगारांना घरे मिळण्याचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता आॅनलाइनद्वारे नव्याने अर्ज करण्याची संधी प्राप्त झाल्याने कामगारांच्या संख्येत आणखी वाढ होईल.
गिरणी कामगार आझाद मैदानावर धडकणार
By admin | Published: June 06, 2017 2:14 AM