मुंबई : गुंतवणुकीच्या रकमेवर १८0 टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांसह मुंबईकरांना गंडा घालून पसार झालेल्या महाठग मोहनप्रसाद श्रीवास्तव, त्याचा मुलगा कार्तिक यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचा वनराई पोलीस शोध घेत आहेत. या रॅकेटद्वारे श्रीवास्तव कुटुंबाने गुंतवणूकदारांचे सुमारे सातशे ते हजार कोटी रुपये हडप केल्याचा पोलिसांचा संशय आहे. माहीम येथील डॉ. केदार गानला यांनी केलेल्या तक्रारीने हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर वनराई पोलिसांनी मोहनप्रसाद, त्याची पत्नी विभा, मुलगा कार्तिक, मुलगी अर्चिता, सून प्रीती या श्रीवास्तव कुटुंबीय तसेच धर्मेंद्र निकुंभ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. श्रीवास्तव कुटुंबीय उत्तर प्रदेशात पळून गेल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. डॉ. गानला यांच्या तक्रारीनुसार मुंबई पोलीस दलातील सहायक निरीक्षक भीमराव वनमाने आणि अर्जुन रजाणे यांनी त्यांची गोरेगाव (पूर्व) येथील फिल्मसिटी रोडवरील सॅटेलाईट टॉवरमध्ये राहणाऱ्या मोहनप्रसाद श्रीवास्तव आणि त्याची पत्नी विभा यांच्याशी ओळख करून दिली होती. त्या भेटीत गुंतवणुकीवर भरघोस व्याज देणाऱ्या अनेक योजना आपल्याकडे असल्याचे श्रीवास्तव दाम्पत्याने सांगितले. त्यानंतर आपण आपल्या काही मित्रांसोबत श्रीवास्तव कुटुंबीयांकडे गेलो असता या दाम्पत्याने त्यांचा मुलगा कार्तिक, सून प्रीती आणि मुलगी अर्चिता यांच्याशी ओळख करून दिली. कार्तिक हा लंडन येथील युरोपियन बँक, यूबीएस बँक येथे प्रमुख गुंतवणूक अधिकारी तसेच संपत्ती व्यवस्थापन या पदावर होता. कार्तिकच्या योटासीस कन्सल्टन्सी, कार्तिक न्युट्रोसेक्युटीक, ग्रास रूट सॉफ्टवेअरसह एकूण नऊ कंपन्या असून, या कंपन्या इतर बड्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून ९ ते १४ महिन्यांत १८0 टक्के व्याज मिळवून देतात, असे या दाम्पत्याने सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. डॉ. गानला आणि त्यांच्या मित्रांसोबत श्रीवास्तव कुटुंबाने बड्या हॉटेलमध्ये सहा बैठका घेतल्या. सगळे आरोपी अतिशय महागड्या कारमधून तेथे येत असत. त्या बैठकांमध्ये श्रीवास्तव परिवाराने मोठमोठे राजकीय नेते, आयपीएस अधिकारी आणि अभिनेत्यांसोबत असलेली आपली छायाचित्रेही डॉ. गानला यांना दाखवली. त्या सगळ्याचा प्रभाव पडलेल्या डॉ. गानला आणि त्यांच्या मित्रांनी एकूण ३५ कोटी रुपये धनादेश आणि रोखीने कार्तिकच्या हवाली केले. त्याबदल्यात कार्तिकने या गुंतवणूकदारांना गुंतवणूक आणि व्याज अशा रकमेचा गोरेगावच्या अॅक्सिस बँकेचा पुढील तारखेचा धनादेश दिला. मात्र तो धनादेश वटण्याच्या तारखेआधी कार्तिकने आपल्याला फोन करून बँकेत रक्कम नसल्याने धनादेश बँकेत जमा न करण्याची विनंती केली. बँकेत धनादेश टाकण्याची पुढील तारीख आपण फोन करून कळवू, असेही सांगितले. मात्र तसा फोन न आल्याने चौकशी केली असता श्रीवास्तव कुटुंबीय पसार झाल्याचे समजले आणि आपल्या पायाखालील जमीन सरकल्याचे डॉ. गानला यांनी सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉ. गानला यांनी तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून तपास करीत वनराई पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ४0६, ४0९, ४२0, १२0 ब आणि एमपीआयडी ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. केवळ डॉ. गानला आणि त्यांच्या परिचित डॉक्टरांचे ३५ कोटी रुपये हडप केले असून, इतर गुंतवणूकदारांमध्ये २५0हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच अन्य सरकारी अधिकारी आहेत. मात्र यात अडकलेले सरकारी अधिकारी तक्रार करण्यास धजावत नसल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी गुंतवणूकदारांच्या वतीने मुख्यमंत्री तसेच गृहमंत्र्यांना निवेदन सादर करून आर्थिक गुन्हेविरोधी विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)
मुंबईकरांना कोट्यवधींचा गंडा घालून महाठग फरार
By admin | Published: September 24, 2016 4:14 AM