राजरत्न सिरसाट/अकोला: भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने लाखोळी डाळीवरील बंदी नुकतीच उठवली असली, तरी काही कृषिशास्त्रज्ञ अद्यापही या डाळीमुळे अर्धांगवायूचा धोका असल्याचा इशारा देत आहेत; पण लाखोळा डाळीवरील बंदी उठविण्यासाठी एक दशकापासून लढा देणारे डॉ. शांतीलाल कोठारी ही डाळ खाण्यासाठी निर्धोक असल्याचे ठामपणे सांगत असून, एकूणच परिस्थिती सामान्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारी आहे. देशांतर्गत डाळवर्गीय पिकांचे क्षेत्र कमी असून, मानवाला लागणारी पूरक प्रथिने तुरीसह इतर डाळींमध्येही असल्याने देशातील लोकसंख्येची गरज बघून, डाळींची आयात केली जात आहे. डाळींची गरज भागविण्यासाठी या पिकांचे देशांतर्गत क्षेत्र वाढविण्यावर भर दिला जात आहे. यात एकेकाळी उत्पादन व खाण्यावर बंदी घातलेल्या लाखोळी डाळीचा उपयोग वाढविण्यावर आता भर देण्यात असून, त्यासाठी या डाळीवरील बंदी नुकतीच उठवण्यात आली. भारतीय कृषी संशोधन परिषदेची पुसा येथील डाळवर्गीय संशोधन संस्था व छत्तीसगढ कृषी विद्यापीठाने नवे संशोधन करू न कमी विषाक्त (न्यूरोटॉक्सिक अँसिड) असलेल्या लाखोळीच्या डाळीचे वाण विकसित केले असून, हे नवे वाण पेरणीसाठी उपलब्ध केले आहे; परंतु या डाळीचे सतत सेवन केल्यास या आम्लाचे शरीरात साचणारे प्रमाण आरोग्याला अपायकारक ठरू शकतात, असे अनेक कृषितज्ज्ञांचे मत आहे. लाखोळी डाळीचे या राज्यात ५0 हजार हेक्टरच्या जवळपास क्षेत्र आहे. विदर्भात यातील १२ हजार हेक्टर क्षेत्र आहे. विदर्भात आजही पारंपरिक लाखाची डाळ धान काढण्याच्या पंधरा दिवस अगोदर शेतात फेकून दिली जाते. याच फेकलेल्या डाळीचे उत्पादन धानउत्पादक शेतकरी घेत आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कडधान्य संशोधन विभागातर्फे शेतकर्यांना मात्र नव्याने संशोधित, कमी विषाक्त असलेले वाण पेरणीसाठी वापरण्याची शिफारस केली जात आहे; परंतु शेतकर्यांना संशोधित वाण मिळत नसल्याने शेतकरी आजही पारंपरिक लाखोळी डाळीचाच पेरणीसाठी वापर करीत आहेत. लाखोळी डाळीत न्यूरोटॉक्सिक अँसिड असल्याने तिचे सतत सेवन केल्यास अर्धांगवायू होतो; परंतु पुसा आणि छत्तीसढ विद्यापीठाने लाखोळीचे नवे वाण विकसित केले . शेतकर्यांना नवीन वाण पेरण्याची आता शिफारस करण्यात येत असल्याचे पंदेकृविच्या ,कडधान्य संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. ए.एन. पाटील यांनी सांगीतले तर ५५ वर्षांत लाखोळी डाळीने कधीच कुणाला अर्धांगवायू झाल्याचे उदाहरण नाही. लाखोळी डाळ कधीच नुकसानकारक नव्हती. उलट ती आरोग्याला पूरक असल्याचे नागपूर येथील समाजसेवी डॉ. शांतीलाल कोठारी यांनी स्पष्ट केले.
लाखोळी डाळीरील बंदी उठली ; शास्त्रज्ञ म्हणतात, धोका कायम!
By admin | Published: January 23, 2016 1:57 AM