पिंपरी : गवळीमाथा येथील शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसचे चालन, देखभाल व दुरुस्तीसाठी येणाऱ्या सुमारे ६१ लाख रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. शहरातील विविध विकासविषयक कामे करण्यासाठीच्या सुमारे तीन कोटी १८ लाखांच्या खर्चासही स्थायी समितीने मान्यता दिला. त्यात जलनिस्सारण नलिका दुरुस्तीची कामे अधिक आहेत.स्थायी समिती सभागृहात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी डब्बू आसवानी होते. मोशी येथील स्मशानभूमीचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या सुमारे २४ लाख ९५ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली. तसेच पुणे-मुंबई हमरस्ता निगडी ते दापोडी सुशोभीकरणासाठी सुमारे ४२ लाख ४३ हजारांचा खर्च होणार आहे. तसेच पुणे-मुंबई हमरस्ता निगडी ते दापोडी सुशोभीकरणाचे नूतनीकरण करण्यासाठी व त्याची दोन महिने देखभाल करण्यासाठी सुमारे ३८ लाख ८२ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रभाग क्रमांक २८ मासूळकर कॉलनी मगर स्टेडिअमलगत सीमाभिंत बांधण्यासाठी व चारही बाजूंनी भिंतीची उंची वाढविण्यासाठी ४१ लाख ९९ हजार, प्रभाग क्रमांक ६४ मधील दापोडी येथे घाट बांधण्यासाठी येणाऱ्या सुमारे २६ लाख ३३ हजारांच्या खर्चासही मान्यता दिली.जलनिस्सारण वाहिन्या दुरुस्तीवर खर्चब, क, ड, फ प्रभागांतील जलनि:सारण वाहिनीची देखभाल-दुरुस्ती व ड्रेनेज दुरुस्तीच्या कामासाठी प्रत्येकी एक-एक कोटी रुपये देण्याचे मंजूर केले. यात वाहिन्यांच्या कामांची देखभाल दुरुस्ती, ड्रेनेजलाइनमधील चोकअप काढण्याचे काम ठेकेदारामार्फत केले जाते. दरम्यान, जलनिस्सारण वाहिन्या बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)>कंत्राटदारांचा नकार : काम दुसऱ्या ठेकेदाराकडेक व ड प्रभागांतील काम एका संस्थेकडे होते. मात्र, कंत्राटदाराने काम करण्यास नकार दिल्याने, ड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील काम दुसऱ्या ठेकेदारास पाच टक्के कमी दराने दिले होते. क क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील काम तिसऱ्या संस्थेला दीड टक्के कमी दराने म्हणजे एक कोटी तीन लाखांनी दिले. ब क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत यापूर्वीच्याच संस्थेला ४.६४ टक्के दराने म्हणजे दोन कोटी रुपयांना दिले आहे. फ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतही गेल्या वर्षीच्या ठेकेदारास पाच टक्के कमी दराने म्हणजे एक कोटी ३० लाखांना दिले आहे. या विषयांना स्थायीने मंजुरी दिली.
कोट्यवधींचा खर्च मंजूर
By admin | Published: June 29, 2016 1:35 AM