गोपालकृष्ण मांडवकर । लोकमत न्यूज नेटवर्क पुरंदावडे (जि. सोलापूर) : ज्ञानोबा माऊलीच्या पालखी सोहळ्यातील पहिला गोल रिंगण सोहळा गुरुवारी दुपारी पुरंदावडे येथे पार पडला. माऊलींच्या अश्वांनी दोन रिंगण पूर्ण करताच लक्षावधींच्या मुखातून ‘माऊली.... माऊली....’ असा जयघोष उमटला. अश्वांच्या खुरांनी पुनित झालेली माती कपाळी लावण्यासाठी उडालेली झुंबड, त्यानंतर पालखीपुढे तब्बल अर्धा तास रंगलेल्या दिंडीच्या उडी सोहळ्यातून निर्माण झालेल्या ब्रह्मनादाने संपूर्ण वातावरणच भारावून गेले.अगदी सव्वा वाजता माऊलींची पालखी सदाशिवनगरजवळ असलेल्या पुरंदावडे येथे पोहोचली. विस्तीर्ण मैदान आधीच लक्षावधींच्या जनसागराने फुलून गेले होते. माऊलींच्या अश्वांनी रिंगण सोहळ्यातील सजविलेल्या मैदानात प्रवेश केला. त्या पाठोपाठ माऊलींच्या गजरात ज्ञानोबारायांची पालखी प्रवेशली आणि सजविलेल्या मंडपातील आसनावर विराजमान झाली.चोपदारांनी संपूर्ण तयारीची खात्री केली. स्वाराच्या आणि माऊलींच्या अश्वाला पालखीजवळ आणले. त्यानंतर बरोबर दोनच्या ठोक्याला हा नेत्रदीपक रिंगण सोहळा सुरू झाला. रांगोळ्यांनी सजविलेल्या रिंगणातील मार्गावरून आधी स्वाराचा अश्व दौडत निघाला. त्याच्या अगदी मागे माऊलींचा अश्व चौखुर उधळीत निघाला. पहिल्या रिंगणापाठोपाठ दुसरे रिंगण या अश्वांनी विद्युत वेगाने पूर्ण केले. माऊलींच्या पालखी पुढे येऊन अश्व थांबताच रिंगण पूर्ण झाल्याची घोषणा चोपदारांनी केली. स्वारामागे असलेल्या पांढऱ्या शुभ्र अश्वावर माऊली विराजमान असते, अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. त्या श्रद्धेपोटी अश्वांच्या टाचांनी पुनित झालेली माती उचलण्यासाठी भाविकांनी धाव घेतली.शहाजी फुरडे-पाटील। लोकमत न्यूज नेटवर्क अकलूज :उंच पताका झळकती टाळ मृदंग वाजती प्रेमे आनंदी नाचती भद्र जाती विठ्ठलाचे आले हरीचे विनटवीर विठ्ठलाचे सुभट मेणे झाले दिक्पट पळती घाट दोषांचे’अखंडपणे सुरू असलेला विठू नामाचा गजर... ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष...टाळ मृदंगाच्या आवाजाने सर्वत्र तयार झालेले भक्तीमय वातावरण अशा उत्साही वातावरणात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे जिल्ह्यातील पाहिले गोल रिंगण गुरुवारी दुपारी अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात पार पडले.आज सकाळी ८़३० वाजता नीरा नदी ओलांडून पालखी सोहळ्याचे अकलूज नगरीत आगमन झाले. जुन्या अकलूजमध्ये पालखी सोहळ्याने प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर सकाळी १० नंतर दिंड्या माने विद्यालयात येऊ लागल्या. मैदानाच्या मध्यभागी उभारलेल्या भव्य शामियान्यात पालखी स्थानापन्न झाली. त्यानंतर खा़ विजयसिंह मोहिते-पाटील आणि नंदिनीदेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते पादुकांचे पूजन करण्यात आले. रिंगणानंतर ‘भाग गेला, शीण गेला अवघा झाला आनंद’ या अभंगाप्रमाणे वारकऱ्यांनी फुगडी, मनोरे आदी खेळांचा आनंद घेतला. रिंगण सोहळा पार पडल्यानंतर लगेच समाज आरती घेण्यात आली.
लक्षावधी डोळ्यांनी अनुभवला रिंगण सोहळा!
By admin | Published: June 30, 2017 1:29 AM