नागपूर : राज्यात शेतकरी सावकारी कर्जाच्या विळख्यात अडकला असल्याची माहिती सरकारने दिलेल्या उत्तरातूनच समोर आली आहे. २०१७ या वर्षात १२,२१४ सावकारांनी १० लाख ९५ हजार ७०१ कर्जदारांना तब्बल १,६१५ कोटींचे कर्ज वितरित केले असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी विधानसभेतील प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे. मात्र हे परवानाधारक सावकार असून सहकारी बँका, व्यापारी बँकांकडूनही कोट्यवधींचे कर्ज शेतकऱ्यांना वितरित केले जाते. त्यामुळे शेतकरी सावकारांच्या जाळ्यात अडकत चालला आहे हे म्हणणे संयुक्तिक नसल्याचा दावाही सहकारमंत्र्यांनी उत्तरात केला आहे.कर्जमाफीच्या अटी जाचक असल्याने आणि शासनाचे अनुदान वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी सावकारांकडून कर्ज काढत असल्याबाबतचा तारांकित प्रश्न विचारण्यात आला होता. यावर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले आहे की, राज्यात ३१ मार्च २०१६ अखेर १२,२०७ परवानाधारक सावकारांनी १० लाख ८६ हजार २५६ शेतकरी व बिगर शेतकरी कर्जदारांना १,२५५ कोटींचे कर्ज वाटप केले तर २०१७ मध्ये १२,२१४ सावकारांनी १० लाख ९५ हजार ७०१ कर्जदारांना १,६१५ कोटींचे कर्ज वाटप केले आहे. या तुलनेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि व्यापारी बँकांनी २०१६ मध्ये ५८.४७ लाख खातेदारांना रब्बी आणि खरीपासाठी ४०५८१ कोटींचे कर्ज वाटप केले तर २०१७ मध्ये ५७.८ लाख खातेदारांना दोन्ही हंगामासाठी ४२,१७२ कोटींचे कर्ज दिले आहे. त्यामुळे शेतकरी सावकारांच्या जाळ्यात अडकत चालला आहे हे म्हणणे संयुक्तिक नाही, असे देशमुख यांनी सांगितले आहे.देशमुख यांनी सांगितले की, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमाच्या तरतुदीनुसार सावकारांना परवाने देण्यात येतात. तसेच कायद्याने विहित केलेल्या दरानुसार व्याज आकारणी करणे सावकारांना बंधनकारक आहे. बेकायदेशीर सावकारीबाबत प्राप्त होणाºया तक्रारीबाबत अधिनियमातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येते, असे देशमुख यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.