मुंबई : अवघ्या ८ लाखांत मिळणाऱ्या घरांची जाहिरात वाचून त्यांनी आयुष्यभराच्या जमापुंजीसह पत्नीचे मंगळसूत्रही विकले. सुरुवातीला ४ लाख रुपये भरून नव्या घराचे स्वप्न रंगविणे सुरू असतानाच, विकासक पैसे घेऊन पसार झाल्याची घटना सांताक्रूझमध्ये घडली. या प्रकरणी तब्बल ८ महिन्यांनी सांताक्रूझ पोलिसांनी दोन विकासकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. वरळी येथील बीडीडी चाळीत राहणारे मधुकर पिस्का (४३) हे सानपाडा येथील सुरक्षा मंडळात सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. ३ मार्च २०१२ रोजी त्यांनी एका इंग्रजी दैनिकात निकेतन उदय प्रकल्पाची जाहिरात वाचली. त्यात नेरळ जितेगाव येथे सुरू असलेल्या प्रकल्पात अवघ्या ८ लाखांमध्ये फ्लॅट मिळत असल्याची माहिती मिळाली. ते जागा बघून आले. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून, विकासकाने त्यांना ४ लाख रुपये भरण्यास सांगितले आणि उर्वरित रकमेचे कर्ज घेण्याचा सल्ला दिला. प्रकल्प २०१६ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. २० फेब्रुवारी रोजी फ्लॅटचे काम पाहण्यासाठी गेलेल्या पिस्का दाम्पत्यांना धक्काच बसला. कारण जागेवर कसलेच काम सुरू नव्हते. विकासकाशी संपर्क साधला, तेव्हा प्रकल्प बंद झाल्याची माहिती मिळाली. पैशांबाबत विचारणा केली असता, धमकावल्याचे पिस्का यांनी सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, १८ मे २०१६ रोजी त्यांनी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार केली. (प्रतिनिधी) आठ महिने मधुकर पिस्का यांच्यावर पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजविण्याची वेळ आली. अखरे लढ्याला यश येत, पोलिसांनी विकासक कार्तिक शांतीलाल रावल आणि रमेश पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
विकासकाकडून लाखोंची फसवणूक
By admin | Published: January 07, 2017 4:04 AM