- वासुदेव पागी / ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 13 - विद्यार्थ्याकडून लाच घेताना रंगेहाथ पकडलेला आल्तिनो येथील आयटीआयचा ज्येष्ठ इन्स्ट्रक्टर के. हेन्री डॅनिएल मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या नावाखाली युवकांकडून पैसे घेत होता अशी माहिती तपासातून उघड झाली आहे.
कँबिनेट सचिव म्हणून बोगस ओळखपत्र तयार करून त्याचा गैरवापर त्याने चालविला होता. त्याच ओळखपत्राचा उपयोग करून तो आपले प्रशासनात फार मोठे वजन असल्याचे सांगत होता आणि बेरोजगार युवक आणि युवतींना नोकरी देण्याचे आमिष दाखवित होता. त्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेत होता. हे पैसे स्वतःसाठी नसून आपद्ग्रस्तांसाठी वापरण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्य निधीसाठी आहे. हा पैसा त्या खात्यात आपण जमा करतो असे तो सांगत होता. प्रत्येकाकडून 3 हजारापासून 23 हजार रुपये तो घेत होता. ज्या युवकांची त्याने फसवणूक केली त्यांच्याकडूनच त्यांच्या या हरकतीचा भांडाफोड करण्यात भ्रष्टाचार विरोधी विभागाच्या पोलिसांनी यश मिळविले.
पैसे घेऊनही नोकऱ्या न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या उमेदवारांची अमुक खात्यात नोकरभरती होणार आहे वगैरे सांगून तो समजूत घालत होता अशी माहितीही उघडकीस आली आहे.
आयटीआमध्ये प्रवेश देण्यासाठी उमेदवाराकडून दीड हजाराची रक्कम घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर तो राहत असलेल्या बांबोळी येथील सरकारी निवासात पोलिसांनी छापा टाकला होता. या छाप्याच्यावेळी मोठ्या प्रमाणावर लोकांची शैक्षणिक प्रमाणपत्रे पोलिसांच्या हाती लागली होती. त्याचवेळी हा माणूस नोकरी देण्याचे आमिष दाखवून युवक युवतींना फसवीत असावा असा पोलिसांना संशय आला होता. ज्या युवक युवतींची प्रमाणपत्रे पोलिसांना मिळाली होती त्या युवक युवतींना संपर्क केल्यानंतर हेन्रीच्या काळ्या कृत्यांचा भांडाफोड झाला.
हेन्रीच्या भनगडींची यादीच पोलिसांनी मिळविली आहे. पगाराचे बोगस प्रमाणपत्र लावून त्याने डिचोली येथील एका बँकेकडून कर्जही मिळविल्याचे उघड झाले आहे. म्हापसा येथे २००५ साली बोगस महाविद्यालय उघडून शुल्काद्वारे लाखो रुपये बळकावल्यााचा गुन्हा त्याच्यावर नोंदविण्यात आला होता.
फसवणूक मुख्य धंदा
हेन्री हा आयटीआयमध्ये इन्स्ट्रक्टरची नोकरीला जरी असला तरी ही नोकरी त्याच्या कमाईचा मुख्य स्रोत नव्हता. मुख्य स्रोत होता फसवणूक, घोटाळे आणि भ्रष्टाचार. आयटीआयमधील विद्याथ्यार्थ्यांकडूनही तो आपले स्वतःचे किरकोळ खर्च करून घेत होता. मोबाईल रिचार्ज करून घेणे तर नित्याचा क्रम होता.