ऑनलाइन लोकमत, नरेश डोंगरे
नागपूर, दि. 04 - विविध अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांचे कागदोपत्री प्रवेश दाखवून शिष्यवृत्ती आणि अनुदानाच्या नावाखाली नागपुरातील दोन संस्थांनी शासनाकडून लाखोंची रोकड उचलल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. ही बनवेगिरी मंगळवारी रात्री उघड झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर बजाजनगर पोलिसांनी शिक्षक, मुख्याध्यापकासह दोन संस्थांच्या संचालक आणि अन्य पदाधिकाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल केले.गरजू विद्यार्थ्यांना चांगले आणि व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करता यावे आणि त्यांना त्यातून चांगल्या रोजगाराची संधी मिळावी म्हणून शासनाने समाजकल्याण विभागामार्फत अनेक योजना राबविणे सुरू केले. अनेक संस्थाचालकांनी या योजना कागदोपत्री राबवून योजनांचे खोबरे करतानाच शासनाला कोट्यवधींचा चुना लावला. बजाजनगरातील कुसुमताई वानखेडे व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राचे शिक्षक आणि विवेकानंद महाविद्यालयाच्या संस्थाचालकांनीही असेच केले. तेलंगखेडी, रामनगरातील रहिवासी विशाल अरुण माटे आणि निखिल सुरेश काळे (विश्वकर्मानगर) यांनी २०१० मध्ये कुसुमताई वानखेडे व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरमध्ये थ्रीडी अॅनिमेशनच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता. दोन वर्षांचा हा अभ्यासक्रम पूर्ण करताना त्यांची तेथील शिक्षक उमेश लाकडे याच्याशी ओळख झाली. अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र देताना लाकडेने या दोघांना विश्वासात घेतले आणि आणखी काही चांगले अभ्यासक्रम आमच्याकडे आहेत, तुम्ही त्यात प्रवेश घ्या. तुम्हाला कोणतेही प्रवेशशुल्क न भरता घरबसल्या प्रमाणपत्र मिळेल. त्याचा चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी फायदा होईल, असे आमिष दाखवले. या अभ्यासक्रमाची शिष्यवृत्ती परस्पर तुमच्या बँक खात्यात जमा होईल. ती तुम्ही आम्हाला आणून द्या, नंतर तुमचे प्रमाणपत्र घेऊन जा, अशी अट त्याने त्यावेळी ठेवली होती. त्यानुसार विशाल आणि निखिल तयार झाले. त्यांनी त्यांची बारावीची मूळ गुणपत्रिका आणि लिव्हिंग लाकडेच्या हातात दिली. त्यानंतर ४ मे २०१४ ला विशालच्या बँक आॅफ महाराष्ट्रच्या खात्यात तर निखिलच्या युनियन बँकेच्या खात्यात १३ मे २०१४ ला प्रत्येकी २०७० रुपयांची शिष्यवृत्ती जमा झाली.
असे फुटले बिंग ..लाकडेने शिष्यवृत्तीची रक्कम या दोघांना मागितली. त्यांनी आधी आमचे कागदपत्र द्या, नंतर रक्कम देतो, असे म्हटले. त्यामुळे लाकडे आणि या दोघांमधील विसंवाद वाढला. तो टाळाटाळ करीत असल्यामुळे या दोघांनी आपले मूळ प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कुसुमताई वानखेडे प्रशिक्षण केंद्रात धाव घेतली. तेव्हा लाकडेने वर्षभरापूर्वीच नोकरी सोडल्याचे संस्थाचालकाने सांगितले. त्यामुळे विशाल आणि निखीलने समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपली कैफियत ऐकवली. अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता या दोघांचा प्रवेश बजाजनगरातील विवेकानंद महाविद्यालयात झाला असून, ते तेथे नियमित उपस्थित राहून अभ्यासक्रम पूर्ण करीत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली. एवढेच नव्हे तर संबंधित संस्थेच्या चालकांनी या दोघांच्या अभ्यासक्रमापोटी शासनाकडून १ लाख, ४० हजार (एकूण दोन लाख ८० हजार) रुपये अनुदान म्हणून उचलल्याचेही स्पष्ट झाले. आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्याने या दोघांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. हे प्रकरण बजाजनगर ठाण्याच्या हद्दीतील असल्यामुळे ठाणेदार सुधीर नंदनवार यांच्याकडे या दोघांना पाठविण्यात आले. त्यानंतर मंगळवारी रात्री पोलीस उपनिरीक्षक गणेश काळुसे यांनी कुसुमताई वानखेडे व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राचा शिक्षक उमेश लाकडे आणि विवेकानंद महाविद्यालयाचे संस्थापक, संचालक, मुख्याध्यापक आणि इतर संबधितांवर गुन्हे दाखल केलेत्या घोटाळ्याशी संबंधराज्यातील विविध भागात अनेक संस्थाचालकांनी अशाच प्रकारे विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांचा वापर करून बनावट प्रवेश दाखवत शासनाला कोट्यवधींचा चुना लावला. गेल्या वर्षी ते उघड झाले. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या नागपुरात पोलीस आयुक्त असलेले डॉ. के. व्यंकटेशम यांच्या मार्गदर्शनात एक विशेष चौकशी समिती (एसआयटी) नेमली. या समितीने राज्यातील कोणत्या संस्थांनी बनवाबनवी करून किती कोटी रुपये उकळले त्याचा सविस्तर अहवाल सरकारला दिला. डॉ. व्यंकटेशम यांच्या या अहवालामुळे अनेक संस्थांची बनवेगिरी उघड झाली अन् सरकारचे अनुदानापोटी दिले जाणारे कोट्यवधी रुपये वाचले. शिष्यवृत्ती घोटाळा म्हणून चर्चेला आलेल्या या घोटाळ्याने राज्यभर खळबळ उडवून दिली होती. त्याच घोटाळ्याशी नागपुरातील या प्रकरणाचा संबंध असल्याचे खास सूत्रांचे सांगणे आहे.