मुंबई : पक्षप्रमुख खा. असाऊद्दीन ओवेसी यांनी जाहीर सभेत दिलेली आश्वासने हाच आमचा अजेंडा आणि जाहीरनामा आहे, असे ठासून सांगणाऱ्या एमआयएमला आता आपली चूक उमगली आहे.मुंबईच्या विकासासाठी विविध ४० विषयांसंबंधी भूमिका मांडून, कृती आराखडा पक्षाने जाहीर केला आहे. निवडून आल्यानंतर आमचे नगरसेवक त्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे पक्षाचे मुंबईतील नेते व आमदार वारिस पठाण, जिल्हाध्यक्ष शाकीर पटणी यांनी सांगितले.जाहीरनाम्याविना केवळ ओवेसी बंधुंनी जाहीर सभेत दिलेल्या आश्वासनांच्या जोरावर मतदारासमोर जाणार आहोत, असे गेल्या आठवड्यात पक्षाने जाहीर केले होते. आता मात्र, आता एमआयएमने मुंबईच्या विकासासाठी ४० मुद्दे जाहीर केले आहेत.त्यात मुंबईच्या पुनर्विकास आणि मूलभूत नागरी सुविधांची पूर्तता करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण सुरू करणे, कचऱ्याचा निपटारा करण्यासाठी शहराबाहेर डम्पिंग ग्राउंड, पाणीपुरवठा, अल्पसंख्याक भागातील सुधारणासाठी विशेष निधी, ऊर्दू व मराठी भाषेचे संवर्धन, कौशल्यावर आधारित शैक्षणिक अभ्यासक्रम पालिकेच्या शाळेत राबविणे, आठवीच्या वरील विद्यार्थ्यांना लॅपटॉप देणे, अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना पोलीस भरती, स्पर्धा परीक्षण सुरू करणे व पालिकेचा २० टक्के निधी शैक्षणिक क्षेत्रात वापरण्यासाठी प्रयत्नशील राहणे या मुद्द्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
एमआयएमने जाहीर केले ४० मुद्दे!
By admin | Published: February 13, 2017 3:47 AM