Maharashtra Election 2019 : मतांचे विभाजन टाळण्यासाठी एमआयएम उमेदवारानेच धरली काँग्रेसची वाट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 10:47 AM2019-10-18T10:47:27+5:302019-10-18T10:47:34+5:30
येत्या 21 ऑक्टोबरला विधानसभेचे मतदान असून सर्वच राजकीय पक्ष प्रचारात व्यस्त आहेत. परंतु, एमआयएमच्या उमेदवाराने काँग्रेसला पाठिंबा देऊन शस्त्र खाली ठेवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील विरोधी पक्षातून मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले. दिग्गज नेते भाजपमध्ये सामील झाल्यामुळे भाजप सगळीकडे मजबूत झाले असून त्यातच एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे आघाडीच्या उमेदवाराची वाट खडतर झाली आहे. मात्र मालाड मतदार संघात मत विभाजनाचा फायदा भाजपला मिळू नये यासाठी एमआयएमच्या उमेदवाराने चक्क काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
मागील 10 वर्षांपासून मालाड मतदार संघ काँग्रेसकडे आहे. यावेळी काँग्रेसने पुन्हा विद्यमान आमदार असलम शेख यांनाच उमेदवारी दिली होती. भाजपकडून शेख यांना आव्हान देण्यासाठी रमेश सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली. तर मुस्लीम बहुल मतदारसंघात एमआयएमकडून इस्लाम शेख यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे भाजपचे पारडे येथे जड झाले होते.
दरम्यान मतांचे विभाजन टाळण्यासाठी एमआयएमचे इस्लाम शेख यांनी काँग्रेसची वाट धरली. असलम शेख यांच्या सभेत जावून इस्लाम यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांना पाठिंबा दर्शविला. त्यामुळे मालाडमधील मतांचे समीकरण अचानक बदलले.
येत्या 21 ऑक्टोबरला विधानसभेचे मतदान असून सर्वच राजकीय पक्ष प्रचारात व्यस्त आहेत. परंतु, एमआयएमच्या उमेदवाराने काँग्रेसला पाठिंबा देऊन शस्त्र खाली ठेवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.