औरंगाबाद : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावावर भाषण करण्यास नकार देणारे औरंगाबादमधील एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना आज अटक करण्यात आली आहे. त्यांना मारहाण करणाऱ्या भाजपाच्या नगरसेवकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शुक्रवारी महानगरपालिकेची समांतर वाहिनीसंदर्भात विशेष सभा बोलाविण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात येत होती. याला एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांनी विरोध दर्शवला. यामुळे संतप्त होत सभागृहातील भाजप नगरसेवक प्रमोद राठोड, दिलीप थोरात, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, राज वानखेडे यांनी मतीन यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर नगरसेवक मतीन यांनी सभागृहातून पळ काढला होता. यानंतर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यांच्या गाड्या फोडल्या होत्या.
या प्रकरणी मतीन यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हा नोंदवावा, तसेच त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापौरांकडे केली होती. या पार्श्वभुमीवर आज, शुक्रवारी रात्री मतीन यांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांना मारहाण करणाऱ्या भाजपाच्या तीन नगरसेवकांवर व इतर दोघांवर मतीन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या तक्रारीवरून झाली अटक उपमहापौर विजय औताडे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, १७ ऑगस्ट रोजी महापालिकेत सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास महापौर नंदकुमार घोडेले यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू झाली. त्यावेळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना ठराव मांडून श्रद्धांजली वाहण्यात आली. सदस्यांची श्रद्धांजलीपर भाषणे चालू असताना एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीन रशीद हा सभागृहामध्ये उभा राहिला आणि ओरडून दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलत होता. यावरून सभागृहात गोंधळ झाला. त्यानंतर तो सभागृहाबाहेर गेला आणि तेथे उभ्या असलेल्या लोकांना चिथावणी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तोडफोड प्रकरणी दोघे अटकेत पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या दरम्यान ७५ ते १०० जणांच्या घोळक्याने महानगरपालिकेच्या बाहेर गोंधळ घातला. यावेळी त्यांनी दोन चारचाकी गाड्यांची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी महमद आवेज महमंद सिद्दिकी व आणखी एकास अटक केली. तसेच सीसीटीव्ही फुटेज पासून आणखी अटक करण्यात येईल अशी माहिती दिली आहे.
या प्रकरणी मतीन यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हा नोंदवावा, तसेच त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापौरांकडे केली होती. या पार्श्वभुमीवर आज, शनिवारी मतीन यांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांना मारहाण करणाऱ्या भाजपाच्या नगरसेवकांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.