एमआयएमचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी ते खासदार इम्तियाझ जलील यांच्या निवासस्थानी इफ्तासाठी उपस्थित राहीले होते. यावेळी त्यांनी लाउडस्पीकरच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला. "भाजप आणि शिवसेना सत्तेत असताना त्यांना लाउडस्पीकरच्या समस्येची जाणीव झाली नाही. भाजपकडून द्वेषाचं संस्थानिकरण केलं जात आहे. राज ठाकरे हे केवळ त्याला चालना देत आहेत," असं ओवेसी म्हणाले.
"मुस्लीम समुदायाला सामूहिक शिक्षा दिली जाते. राज्यांमध्ये आता लोकशाही नाही, तर बुल्डोजर शासन आहे. जर कोणताही मुस्लीम कट्टर झाला, तर देशासाठी ते चांगलं होणार नाही. कायदा व्यवस्था ही सर्वोच्च आहे. यासोबत कोणताही खेळ होऊ नये. महाराष्ट्रात शांतता कायम ठेवण्यासाठी सरकार जबाबदार आहे," असंही ओवेसी म्हणाले.
"पंचिंग बॅग बनवू शकत नाही""मुस्लिमांना कोणीही पंचिंग बॅग बनवू शकत नाही. असं करण्याची कोणात हिंमत नाही. कोण अधिक हिंदू आहे, हे सिद्ध करण्याची सर्व पक्षांमध्ये स्पर्धा सुरू आहे. जर पंतप्रधान निवासस्थानाबाहेर नमाज पठण करायचं आहे असं म्हटलं, तर त्या ठिकाणी असलेले सुरक्षा दलाचे जवान मला गोळी घालतील. जर भाजप नेत्यांसमोर प्रार्थना करायची आहे असं म्हटलं तर ते योग्य नाही. परंतु अशा परिस्थितीत राजद्रोह कायदाही सिद्ध होत नाही. सर्वोच्च न्यायालय याची सूक्ष्मपणे तपासणी करत आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राऊतांवर निशाणासंजय राऊतांनी आपल्या लढाईत मला खेचू नये. राज ठाकरे यांना भडकवण्यासाठी हिंदू ओवेसीच्या रुपात त्यांनी माझं नाव घेऊ नये. तो ठाकरे कुटुंबाचा अंतर्गत कलह आहे. त्यांनी त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असंही ओवेसी म्हणाले. यावेळी त्यांनी राणा दांम्पत्याबाबतही भाष्य केलं. "देशद्रोहाबाबत सर्वोच्च न्यायालय तपास करत आहे. उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन हनुमान चालीसाचं पठण करण्याचं आव्हान त्यांनी देऊ नये. देशद्रोहाचे आरोप सिद्ध करणं खुप कठिण आहे," असंही त्यांनी नमूद केलं.