ग्रामीण विकास : संग्राम केंद्रात मिळणार बँकसुविधादिगांबर जवादे - गडचिरोलीराज्यातील २ हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या सुमारे १ हजार १६३ गावांमध्ये मिनी बँक सुरू करण्यात आल्या असून त्या राष्ट्रीयकृत बँकांशी संलग्न असल्याने या बँकांमध्ये राष्ट्रीयकृत बँकांच्या सर्व सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे ग्रामीण नागरिकांची आर्थिक व्यवहारांसाठी होणारी धावपळ व फजिती थांबण्यास मदत होणार आहे.देशाच्या विकासात बँकांचे अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र अद्यापही बहुतांश ग्रामीण भागात बँक सेवा पोहोचली नाही. हे देशातील वास्तव आहे. ग्रामपंचायतीचे अनुदान, गॅस अनुदान, निराधार नागरिकांना देण्यात येणारे अनुदान व शिष्यवृत्तीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे धोरण शासन आखत असतानाच अनेक गावांमध्ये बँक सुविधा नसल्याने अडचण येत आहे. देशाच्या विकासातील बँकांचे महत्त्व शासनाने ओळखले. पण प्रत्येक गावात राष्ट्रीयकृत बँकेची शाखा उघडणे शक्य नाही. मात्र बँकेचा एखादा प्रतिनिधी ही सेवा देऊ शकतो. ही संकल्पना पुढे आल्यानंतर संग्राम केंद्राच्या माध्यमातून तिला मूर्तरूप प्राप्त झाले. आजपर्यंत राज्यात १ हजार १६३ मिनी बँका सुरू करण्यात आल्या आहेत. काही बँकांचे आर्थिक व्यवहारही सुरू झाले आहेत. काही बँकांमध्ये खाते उघडण्याचे काम सुरू आहे. सध्या केवळ आर्थिक देवाणघेवाणीचे काम केले जात असून भविष्यात १५ ते २० हजारापर्यंतचे कर्ज देणे, फिक्स डिपॉझिट, आरडी कलेक्शन, विद्युत बिल भरणे, निराधार नागरिकांचे पैसे याच खात्यावर जमा करणे अशी राष्ट्रीयकृत बँकांमार्फत केली जाणारी सर्वच कामे याठिकाणी केली जाणार आहेत. महत्वाचे म्हणजे बँकेच्या आर्थिक व्यवहारातून प्राप्त होणाऱ्या नफ्याचा काही हिस्सा ग्रामपंचायतीलाही मिळणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती भक्कम होण्यास मदत होणार आहे.
राज्यात १ हजार १६३ गावांत मिनी बँका
By admin | Published: July 08, 2014 1:14 AM