लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक होत असल्याने राज्य सरकार बुधवारी मिनी लॉकडाऊनसारखे आणखी काही निर्बंध जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलविली आहे. त्या निर्णयांची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देतील व निर्बंध जारी केले जातील, असे सूत्रांनी सांगितले.
मंत्रिमंडळाची बुधवारी होणारी बैठक उद्या होणार नाही. उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित विभागांचे मंत्री, पोलीस, प्रशासन, टास्क फोर्स यांच्यासह बैठक घ्यावी, त्यात निर्बंधांचे स्वरुप निश्चित करावे व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा असे ठरले आहे.केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज मंत्रालयात बैठक घेतली. केंद्राने राज्यांना लस, औषधांसह वाढीव निधीही दिला आहे. त्यामुळे राज्याने काम करण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.
केंद्राने सरकारी कार्यालयांमधील उपस्थितीबाबत निर्बंध जारी केले होते. तसाच निर्णय राज्यात घेतला जाऊ शकतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती व अन्य कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळा वेगवेगळ्या ठेवणे असा पर्याय स्वीकारला जाऊ शकतो.
‘नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’पुणे : सध्या जिल्ह्यात पाॅझिटिव्हिटी दर तब्बल आठरा टक्क्याच्या पुढे गेला आहे. यामुळेच राज्याच्या टास्क फोर्सशी चर्चा करून शहर आणि ग्रामीण भागातील सर्व खासगी, सरकारी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा पुढील आदेशापर्यंत पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्व खासगी व सार्वजनिक ठिकाणी आता ‘लस नाही, तर प्रवेश नाही ’ असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. तसेच मास्क न घालणाऱ्या लोकांना ५०० रुपये तर रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १००० रुपये दंड करण्यात येणार आहे.