मुंबई : राज्यातील शहरी आणि ग्रामीण जनतेचा कौल स्पष्ट करणाऱ्या महापालिका आणि मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. ६ कोटी ११ लाख मतदार या निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य आणि पयार्याने राज्याच्या राजकारणाची पुढील दिशा निश्चित करणार आहेत. मुंबईसह राज्यातील दहा महापालिकांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात १५ जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या १६५ पंचायत समित्यांची निवडणूक १६ फेब्रुवारीला तर दुसऱ्या टप्प्यात ११ जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांची निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार असून त्यासाठीची आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी आज पत्रपरिषदेत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक असलेल्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही घोषणा ही आचारसंहितेचा भंग ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)
... तर उमेदवार अपात्र : उमेदवारांना एकूण खर्चाचा तपशील निकाल लागल्यानंतर ३० दिवसांत संबंधित जिल्हाधिकारी किंवा महानगरपालिका आयुक्तांकडे सादर करावा लागेल. विहीत पद्धतीने व मुदतीत खर्च सादर न केल्यास संबंधित उमेदवारास अनर्ह केले जाईल. राजकीय पक्षांनी विशिष्ट उमेदवारावर केलेला थेट खर्च आणि उमेदवारांमध्ये विभाजित करता येणारा खर्च २० दिवसांत सादर करणे आवश्यक आहे. निवडणूक खर्चासाठी स्वीकारलेला निधी व स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय एकूण खर्चाचा तपशीलही पक्षांना निकाल लागल्यानंतर ६० दिवसांच्या आत द्यावा लागेल.नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक नाहीनागपूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली असल्याने आज त्या ठिकाणची निवडणूक जाहीर करण्यात आली नाही, असे सहारिया यांनी स्पष्ट केले. अन्य ठिकाणी प्रकरण न्यायप्रविष्ठ असेल तर तेथेही निवडणूक होणार नाही, असे ते म्हणाले. याबाबत उत्सुकतालोकसभा, विधानसभा व नगरपालिकांमधील यशाची पुनरावृत्ती भाजपा करेल का? शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेवर भगवा टिकणार की नाही? दिग्गज नेते नितीन गडकरी अन् मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर महापालिकेत भाजपाची सत्ता अबाधित राहील काय?ग्रामीण महाराष्ट्रावर पकड कोणाची? गेल्यावेळप्रमाणे काँग्रेस, राष्ट्रवादी जि.प.मध्ये वरचष्मा कायम ठेवतील का? प्रतिष्ठा पणालाराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, नारायण राणे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक लहानमोठे नेते आणि पक्षांची प्रतिष्ठा या निमित्ताने पणाला लागली आहे. 21फेब्रुवारी दहा महापालिकांसाठी होणार मतदानअकोला, अमरावती, ठाणे, उल्हासनगर, मुंबई, नाशिक, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, पुणे आणि नागपूर
16फेब्रुवारी पंधरा जिल्हा परिषदांसाठी मतदानजळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली. (या जिल्हा परिषदांतर्गत येणाऱ्या १६५ पंचायत समित्यांची निवडणूकदेखील १६ फेब्रुवारीलाच होईल. गडचिरोली जिल्ह्यात ८ पंचायत समित्या व जि.प.गणात निवडणूक या दिवशी होईल.)21फेब्रुवारी अकरा जिल्हा परिषदांसाठी मतदान रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, नाशिक, अमरावती, गडचिरोली. (या जिल्हा परिषदांतर्गत येणाऱ्या ११८ पंचायत समित्यांची निवडणूक २१ फेब्रुवारीलाच होईल. त्यात गडचिरोलीच्या चार पंचायतींचा समावेश)
दहा महापालिका1.94 कोटी मतदार
२५ जिल्हा परिषद आणि २८३ पंचायत समित्यांमध्ये ४.१७ कोटी मतदार.
23 फेब्रुवारी सर्व ठिकाणचा निकाल