पुणे : उत्तरेकडी थंड वाऱ्यांचा जोर आणखी वाढल्याने राज्यात सर्वत्र थंडीचा कडाका वाढला असून मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान चंद्रपूर येथे ८.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.
विदर्भात किमान तापमानाबरोबरच काही भागात कमाल तापमानातही सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ६ अंश सेल्सिअसने घट झाली आहे. मराठवाड्यातील काही भागात किमान तापमान २ ते ३ अंशांची घट झाली आहे. परभणीत किमान तापमानात लक्षणीय घट झाली असून तेथे मंगळवारी सकाळी पारा १०.१ अंशापर्यंत खाली आला आहे. सरासरीच्या तुलनेत ७.३ अंश सेल्सिअसने घट नोंदविली गेली आहे. कोकणात किमान तापमान सरासरीइतके होते. मात्र मंगळवारी कोकणातील किमान तापमान सरासरीपेक्षा खाली गेले. आणखी दोन दिवस तापमानातील ही घट कायम राहण्याची शक्यता आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) :
पुणे ११.३, लोहगाव १२.७, जळगाव १२, कोल्हापूर १६, महाबळेश्वर १३.६, मालेगाव १३.२, नाशिक ११.८, सांगली १४.५, सातारा १२.८, सोलापूर १३, मुंबई २२.५, सांताक्रुझ १९.२, रत्नागिरी २१, पणजी २०, डहाणु १९.८, उस्मानाबाद १४, औरंगाबाद १२.५, परभणी १०.१, नांदेड १३.७, बीड १५.४, अकोला १२.७, अमरावती १२.५, बुलढाणा १३.८, ब्रम्हपुरी १३.२, चंद्रपूर ८.२, गोंदिया १०.५, नागपूर ११.५, वाशिम १२.६, वर्धा १२.४़