मुंबई: पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी पत्र लिहिलं आहे. ओमायक्रॉनचा धोका वाढत असताना ठाकरेंनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून काही महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत. देशातील जनजीवन पूर्वपदावर येत असताना लोक ओमायक्रॉनमुळे चिंतेत आहेत. त्यामुळे शिफारशींचा विचार करावा, असं आवाहन ठाकरेंनी पत्रातून केलं आहे.
वर्षाच्या सुरुवातीला कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या फ्रंट लाईन आणि हेल्थकेअर वर्कर्सना त्यांच्या इच्छेनुसार तिसरा डोस घेण्याची परवानगी द्यावी, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. कोरोना लस घेण्यासाठी असलेली वयाची मर्यादा १५ वर्षांपर्यंत करावी. त्यामुळे माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांना, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना लस मिळू शकेल, असं ठाकरेंनी पत्रात नमूद केलं आहे.
कोरोना लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याबद्दल विचार करण्याची विनंतीदेखील आदित्य ठाकरेंनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली आहे. 'दोन डोसमधील अंतर ४ आठवड्यांवर आणण्यात यावं. त्यामुळे मुंबईतील १०० टक्के नागरिकांचं लसीकरण जानेवारी २०२२ च्या मध्यापर्यंत पूर्ण होईल,' असं आदित्य यांना पत्रात नमूद केलं आहे. सध्या मुंबईत १०० टक्के नागरिकांना पहिला डोस मिळाला असून दोन्ही डोस मिळालेल्या नागरिकांचं प्रमाण ७३ टक्के इतकं आहे, अशी आकडेवारी ठाकरेंनी पत्रात दिली आहे.