'काँग्रेस पक्षांनेच अनेकदा राष्ट्रवादीच्या पाठीत खंजीर खुपसलं'; जयंत पाटील यांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 09:54 PM2022-05-13T21:54:39+5:302022-05-13T21:59:38+5:30
नाना पटोले यांच्या या आरोपानंतर राष्ट्रवादीनेही प्रत्युत्तर दिलं आहे. मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाना पटोले यांच्यावर पलटवार केला आहे.
सांगली- गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या अध्यक्ष आणि सभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा लिखीत करार मोडून राष्ट्रवादीने भाजपासोबत जाऊन सत्ता स्थापन केली, ही दगाबाजीच आहे. याला पाठीत खंजीर खुपसणे नाही तर दुसरे काय म्हणायचे? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. आम्ही जे काही करतो ते खुलेआम करतो. काँग्रेस पक्ष देशाच्या विकासाची आणि विचारांची लढाई लढत आहे, आम्ही परिणामाची चिंता करत नाही, असंही नाना पटोले यावेळी म्हणाले.
महाविकास आघाडीत ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी मी सातत्याने संपर्क साधला आणि भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अध्यक्ष आणि सभापती निवडणुकीत आघाडीबाबत चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेसने शेवटपर्यंत आम्हाला ताटकळत ठेवले आणि ऐनवेळी भाजपासोबत जाऊन पंचायत समित्यांमध्ये आणि गोंदिया जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली, असा आरोप नाना पटोले यांनी केला.
नाना पटोले यांच्या या आरोपानंतर राष्ट्रवादीनेही प्रत्युत्तर दिलं आहे. मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाना पटोले यांच्यावर पलटवार केला आहे. काँग्रेस पक्षांनेच अनेक वेळा राष्ट्रवादीच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे. तसेच भाजपाबरोबर आघाडी करून काँग्रेस पक्षाने अनेक वेळा, राष्ट्रवादीला फसवलं असल्याचा आरोपही जयंत पाटलांनी केला. मिरज मेडिकल कॉलेजच्या पदवीदान सभारंभानंतर पाटील हे प्रसार माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, प्रामाणिकपणे मैत्री करणे आणि मैत्री निभावणे ही काँग्रेसची भूमिका आहे. आम्ही कायमच आघाडी धर्म पाळला आहे. आम्ही समोरून लढतो पाठीमागून वार करत नाही. माझ्यावर टीका करणा-यांची पार्श्वभूमी सर्वांना माहित आहे. त्याबाबत मी काही बोलण्याची गरज नाही. गेली अडीच वर्ष सत्तेत सोबत राहून राष्ट्रवादीने आम्हाला कशी वागणूक दिली या संदर्भात मी पक्षश्रेष्ठींना अवगत करणार आहे. दगाफटका खपवून घेणार नाही. आम्ही कधीही सत्तेसाठी लांगूनचालन केले नाही. परिणामांची चिंता करायला काँग्रेस सक्षम आहे, असंही नाना पटोले म्हणाले.
'नाना पटोलेंचं विधान हास्यास्पद'- उपमुख्यमंत्री अजित पवार
आम्ही कधीच पाठीत खंजीर खुपसला किंवा तलवार खुपसली असं म्हणत नाही. नाना पटोले यांनी केलेलं वक्तव्य हास्यास्पद आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. नाना पटोले आधी काँग्रेसमध्ये होते. मग भाजपामध्ये गेले त्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये आले. त्यामुळे झाकली मूठ सव्वा लाखाची असते. ती प्रत्येकाने झाकूनच ठेवावी. आम्ही कधी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसल्याची भाषा करत नाही. नाना पटोलेंनी केलेलं वक्तव्य हास्यास्पद आहे. त्यांच्या राजकीय पक्षांतराचा इतिहासही आपण पाहायला हवा, असं अजित पवार म्हणाले.