अहमदनगर : निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेलेले अनेक मित्र अस्वस्थ आहेत. ते तिकडे गेल्याने त्यांची जागा पक्षातील तरुणांनी घेतली आहे. त्यामुळे मित्रांनी आता तिकडेच सुखी राहावे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर नाव न घेता केली. राज्यातील सरकार स्थापनेनंतर मंत्री बाळासाहेब थोरात हे प्रथमच नगर शहरात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
माजी खासदार दादा पाटील शेळके यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी ते हेलिकॉप्टरने शुक्रवारी नगरमध्ये आले होते. येथील जिल्हा पोलीस मुख्यालयावर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मंत्री थोरात यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, लहू कानडे आदी यावेळी उपस्थित होते.
मित्र परत येणार का, पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर देताना थोरात म्हणाले. निवडणुकीपूर्वी अनेक मित्र, नेते पक्ष सोडून तिकडे गेले. पण, भाजपचे सरकार अल्पावधीत पडले. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. ते आपली फसवणूक झाली, असे सांगत आहे. मात्र ते तिकडे गेल्याने रिकामी झालेली जागा तरुणांनी धरली आहे. त्यामुळे तिकडे गेलेल्यांना परत घ्यायचे की नाही, हे आता तरुणांचा विचारावे लागेल. त्यामुळे काही दिवस त्यांनी तिकडेच राहावे, असे थोरात म्हणाले.
महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस, या तीन पक्षांच्या प्रत्येकी दोन अशा सहा मंत्र्यांनी शपथ घेतली असून, मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीपूर्वी थोरात यांचे पारंपरिक विरोधक माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे भाजपवासी झाले. विधानसभेची निवडणूक विखे यांनी भाजपकडून लढविली. प्रचारादरम्यान विधानसभेत १२-० करुन दाखवू, असा इशारा विखे यांनी दिला होता. तर कांग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांनी खिंड लढविली होती.
तर निवडणुकीदरम्यान विखे व थोरात यांनी एकमेकांवर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र निवडणुकीनंतर राज्यातील चित्र बदलले. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. हे सरकार स्थापन होण्यात थोरात यांचा मोठा वाटा आहे. राज्यातील सत्ता स्थापनेनंतर प्रथमच नगर शहरात आलेल्या थोरात यांनी विखे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.