Chhagan Bhujbal On Manoj Jarange :मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण झाला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मनोज जरांगे हे ओबीसीतून आरक्षण घेण्याच्या मागणीवर ठाम आहेत. दुसरीकडे या मागणीला ओबीसी नेत्यांसह समाजाकडूनही कडाडून विरोध केला जातोय. अशातच ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांना इशारा दिला आहे. ओबीसीतून मराठा आरक्षण मिळणं शक्य नाही. मराठ्यांनी वेगळं आरक्षण घ्यावं, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केलीय. मात्र, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. मनोज जरांगे यांनी सगेसोयऱ्यांचा मुद्दा उपस्थित केल्यान राज्य सरकारनेही अद्याप त्यांच्या मागणीबाबत ठोस असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. अशातच मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंना इशारा दिला आहे. विधानसभेला २८८ पैकी आठ उमेदवार निवडून आणून दाखवा असं आव्हान छगन भुजबळ यांनी दिलं आहे. सांगलीतल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात छगन भुजबळ बोलत होते.
"मनोज जरांगे अनेकवेळा म्हणाले की, मराठा समजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं नाही तर आम्ही २८८ उमेदवार उभे करणार आहोत. आहो आधी ८८ उमेदवार तर उभे करा आणि त्या उमेदवारामधून फक्त ८ उमेदवारच निवडून आणा. निवडणुकीच्या मैदानात या आणि निवडणुका लढवा. माझं तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही विधानसभा निवडणुकीत २८८ उमेदवार उभेच करुन दाखवा, असं छगन भुजबळ म्हणाले. "ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देणार नाही म्हणजे नाही. न्यायालयाने देखील असचं म्हटल आहे. आधी ओबीसी आरक्षणाचा बॅकलॉग भरा मग बाकीच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवा. ओबीसीला धक्का लावून आरक्षण देणार नाही असं सर्वांनीच म्हंटले आहे. तरी देखील आम्हाला टार्गेट करण्याचे कारण काय? तुम्हाला आरक्षण पाहिजे, कायद्याने जे काही असेल ते घ्या. आम्ही वेगळे काही मागितले नाही. सर्वांनीच कुणबी व्हायचं आहे, तर महाराष्ट्र मध्ये मराठा राहणार का नाही?," असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.
"राज्यात महायुतीच सरकार आहे. मात्र, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणं शक्य नाही म्हणजे नाहीच. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देता येणार नाही. मनोज जरांगेंना यांना सांगा की मराठा समाजाला ओबीसीमधून कदापी आरक्षण मिळणार नाही," असंही छगन भुजबळ म्हणाले.