मुंबई - मुंबई महापालिकेवर कायम शिवसेना-भाजपा युतीची सत्ता राहिली होती. गेल्यावेळी भाजपाने बिनशर्त पाठिंबा शिवसेनेला दिला होता. युती तुटण्यामागे मुख्यमंत्रिपदावरून वाद झाला हे खोटे आहे. असं असते तर निर्विवाद सत्ता शिवसेनेला का दिली याचा विचार जनतेने करायला हवा. प्रत्येकाचा मान राखला पाहिजे. उद्धव ठाकरेंचा मान सर्वाधिक राखतो. पण आदित्य ठाकरे ज्याप्रकारे विधाने करतात त्याला उत्तर यायलाच लागतील. त्यामुळे गौप्यस्फोट करण्याची पाळी आठवडाभरात माझ्यावर येईल आणि गौप्यस्फोट यासाठी करावा लागेल ज्याने वास्तव जनतेसमोर येईल असा इशारा मंत्री दीपक केसरकरांनी दिला आहे.
मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, जे खोटे बोलले जाते त्यामुळे आमदार दुखावले जातात. राजकीय पक्ष विचारधारेवर चालतात. काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडा आणि युती करून सरकार स्थापन करा ही आम्ही जी मागणी केली त्यात चुकीचं काय नव्हते. त्यामुळे तुम्ही जे खोटे आरोप करताय त्याचे उत्तर द्यावेच लागेल अन्यथा यामुळे जनतेच्या मनात आमच्याबद्दल गैरसमज निर्माण होतायेत असं त्यांनी सांगितले.
...तर मोठे उद्योगपती मुख्यमंत्री, पंतप्रधान बनले असतेउद्धव ठाकरेंना एकच माहिती आहे विकत घेणे, विकत घेतले जात असते तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान हे मोठे उद्योगपती बनले असते. बाळासाहेबांनी प्रेमाने कार्यकर्ते जिंकले. बाळासाहेबांसाठी जीव देणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी राज्यात निर्माण केली त्याला शिवसैनिक म्हणतात. ज्यांना ही फळी सांभाळता आली नाही त्यांनी हे विधान करणे चुकीचे आहे. कार्यकर्त्यांना सोडा, मंत्र्यांना, आमदारांनाही भेटण्याची दखल घेतली नाही. त्यांनी हे बोलू नये. स्वत:च्या पदासाठी युती तोडली. तुम्ही दुखावलात म्हणून सगळ्यांनी साथ दिली. परंतु त्याचा परिणाम मूळ पक्षावर झाला. पाचव्या क्रमांकावर शिवसेना फेकली गेली. तरीही तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत फरफटत जात आहात असा आरोप दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंवर केला.
मूळ विचारापासून उद्धव ठाकरे लांब गेलेउद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे हिंदुत्व, तत्वे राखले त्यामागे जायला हवं होते. सावरकरांवर काँग्रेसनं विधान केले तर मूग गिळून गप्प बसावं लागते. कलम ३७० रद्द करणे हे बाळासाहेबांचे स्वप्न होते ते ज्यांनी साकार केले त्यांच्याविरोधात तुम्ही बोलता. कुठल्याही युतीचा आमच्यावर परिणाम होणार नाही. मूळ विचारापासून आपण लांब जातो तेव्हा त्या विचारापासून राहणारे लोक बाहेर पडतात. शिवसेनेच्या मूळ विचारासोबत राहिले त्यांना घाणेरडे बोलायचे ते जनतेला कळेल असंही केसरकरांनी सांगितले. धनुष्यबाण आणि शिवसेना आम्हालाच मिळेलज्यांचे अस्तित्व खोटे बोलणे, त्यावर राजकीय पोळी भाजून घेणे यावर आहे त्यांनी कुठेतरी थांबले पाहिजे. ठाकरेंनी वंचितसोबत युती करावी, महाविकास आघाडीसोबत जाणे हीच राजकीय आत्महत्या होती. विचारांनी ही आघाडी जुळत नाही. बाळासाहेबांच्या विचाराशी फारकत घेतलीय. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार त्याची जपणूक आम्ही करत आहोत. कुठल्याही राजकीय पक्षाला मान्यता दिली जाते ती लोकांनी दिलेल्या मतांवर होते. ९० टक्के खासदार, आमदार ज्यांच्या बाजूने आहेत तिथे निवडणूक आयोग न्याय देईल. मुख्य पक्ष आमच्यासोबत राहील. आम्हीच शिवसेना आहोत, धनुष्यबाण आमचा आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी बंड केले नाही तर उठाव केला. चांगल्या गोष्टीसाठी आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी हा उठाव झाला. विरोधकांची सत्ता गेली ही वाईट गोष्ट असू शकते. पण महाराष्ट्राचा विकास या सरकारकडून होणार आहे असं दीपक केसरकरांनी सांगितले.