मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत. कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे. तर उबाठा पक्ष १ जुलै रोजी आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात मागील एक वर्षात झालेल्या महापालिकेतील भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी जाब विचारण्यासाठी महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटातील नेते सातत्याने मोठी विधाने करत आहेत. अशातच मंत्री दीपक केसरकर यांनी एक विधान करून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले.
जी लोक १ जुलैला मोर्चा काढत आहेत त्यांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचा अधिकार नसल्याची टीका केसरकरांनी केली. "खोटं किती बोलावं याला प्रमाण असते. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी खरं बोलायला शिकायला हवं", असे केसरकरांनी ठाकरेंची सुरक्षा हटवली असल्याच्या प्रश्नावर बोलताना म्हटले. ते पत्रकारांशी बोलत होते.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना केसरकर म्हणाले की, औरंगजेबाबद्दलचे नवे प्रेम झाले असेल तर त्यांनी ते सांगावे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन राज्य चालवत आहोत. छत्रपती संभाजी महाराज आणि मराठी सरदारांना आम्हाला विसरता येणार नाही. उद्धव ठाकरेंचे औरंगजेबाबद्दलचे नवे प्रेम पाहायला मिळते आहे. हिंदुत्वाशी तडजोड करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कधीच माफ करणार नाहीत. तसेच सत्तेसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची लाचारी केली हे ठाकरेंनी कबुल करावे.
अलीकडेच केसरकरांनी एक मोठा गौप्यस्फोट करून राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले. "गेल्या वर्षी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात पुकारलेले बंड यशस्वी झाले नसते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: डोक्यात गोळी झाडून घेणार होते", असे विधान मंत्री दीपक केसरकर यांनी केले.