अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. पुरेसे संख्याबळ असताना देखील अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे सुमारे ३५ आमदारांनी सरकारला पाठिंबा दिल्याने वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अशातच एकनाथ शिंदेंचे काय होणार, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
अजित पवारांसोबत नऊ मंत्र्यांवर कारवाई करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. तर दुसरीकडे थोड्याच वेळात देवगिरीवर अजित पवार समर्थक आमदारांची बैठक आहे. या बैठकीला किती आमदार उपस्थित राहतात आणि किती आमदार अनुपस्थित राहतात यावर सारा खेळ ठरणार आहे.
शरद पवारांनी अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना जनतेसमोर येण्यास सांगितले आहे. तरच आपला विश्वास बसेल असे ते म्हणाले आहेत. अजित पवारांच्या निवास्थानी बैठकीत खातेवाटपावर चर्चा होणार आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला कोणती खाती आली आहेत, त्याची चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर खातेवाटप चित्र होणार स्पष्ट होणार आहे.
शरद पवार आता डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सरसावले आहेत. पवारांची पत्रकार परिषद होत नाही तोच तिकडे विरोधी पक्षनेते पदाची घोषणा करण्यात आली. तसेच आव्हाडांना प्रतोद पदही देण्यात आले. परंतू, राष्ट्रवादीचे आधीचे प्रतोद हे अजित पवारांसोबत असल्याने वेगवान हालचाली करणे गरजेचे होते. आव्हाड यांनी गाफिल न राहता रातोरात राहुल नार्वेकरांचे घर गाठले होते. एकीकडे कायदेशीर लढाई लढणार नाही अशी घोषणा पवारांनी केली आहे, परंतू दुसरीकडे अजित पवारांसह ज्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी राष्ट्रवादी करत आहे.