- लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : तूर खरेदीचा जिल्ह्यात गोंधळ सुरू असताना सामाजिक न्याय राज्यमंत्री व पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी लक्ष न दिल्याची चर्चा असताना त्यावर प्रसार माध्यमांनी टीकेचा सूर आळवताच त्यांची जीभ घसरली. माळहिवरा येथील भाजपाच्या शेतकरी शिवार संवाद यात्रेत पत्रकारांना चक्क बुटाने मारण्याची भाषा वापरली.बाजार समितीत आल्यानंतर कांबळे यांनी सर्व शेतकऱ्यांचे म्हणणेही ऐकून घेतले नाही, अशी काहींनी तक्रार केली. ते फक्त एकाच शेतकऱ्याचे ऐकून निघून गेल्याचे वर्तमानपत्रांतून छापून आल्यानंतर ते संतापले. मी जंगलाचा राजा आहे, हे सांगण्याची मला गरज नाही. आम्ही हारतुरे स्वीकारले तर तुझ्या पोटात का दुखतंय, असा त्यांनी पत्रकारांचा एकेरी उल्लेख केला. पुढे ते म्हणाले, पत्रकारांची जातच बांडगुळ आहे़ तुमच्या जिवावर आमचे राजकारण आहे का? पाकिटं दिली की, हे लगेच दुसऱ्याचे. मी खरा आहे. मी कोणाला घाबरत नाही.शेतकरी फक्त आमच्यावर ‘ओरडतात’काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने शेतमालाला कमी भाव दिला होता. त्यावेळी शेतकऱ्यांनी कोणताच आवाज उठविला नाही. मात्र युती सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या मालाला कमी भाव मिळताच शेतकरी ‘ओरडतात’ असे कांबळे हे सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे शेतकरी शिवार संवाद म्हणाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी गोंधळ घालताच पालकमंत्र्यांनी तेथून काढता पाय घेतला.भाजपा मंत्र्यांची मस्ती जनताच उतरवेल - काँग्रेसपत्रकारांना जोड्याने मारण्याचे शिक्षण मला माझ्या पक्षाने दिले आहे, असे म्हणणाऱ्या भाजपा नेत्यांची सत्तेची मस्ती राज्यातील जनताच उतरवेल,अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. पालकमंत्र्यांनी पत्रकारांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विविध पत्रकार संघटनांनी निषेध केला आहे. रविवारी जिल्हा प्रशासनाला निषेधाचे निवेदन देण्यात येणार आहे. पत्रकार आंदोलनाच्याही पवित्र्यात आहेत.