माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संकेतस्थळावर यादी ‘नो अपडेट’नागपूर : महाराष्ट्र शासनाची माहिती, योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे आहे. मात्र यावर उपलब्ध असलेल्या मंत्र्याच्या यादीवरून या संकेतस्थळाला भेट देणारा प्रत्येक जण संभ्रमात पडतो. मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्र्यांचे नाव आणि त्यांचे खाते ‘अपडेट’ करण्यास माहिती संचालनालय विसरले तर नाही ना, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संकेतस्थळावर लोकराज्य, जय महाराष्ट्र, दिलखुलास, महान्यूज या लिंकसह वृत्त शाखा, जाहिरात शाखा, प्रकाशने शाखा, वृत्तचित्रे, प्रदर्शने शाखा यासह बरीच माहिती उपलब्ध आहे. यापैकी ‘महाराष्ट्र शासनाविषयी थोडेसे’मध्ये मंत्रिमंडळ नावे व पत्ते देण्यात आले आहेत. परंतु ती यादी अपूर्ण असल्याचे दिसून येते. सध्या या संकेतस्थळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विष्णू सावरा या कॅबिनेट मंत्र्यांसह दिलीप कांबळे आणि विद्या ठाकूर यांनाच स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मंत्रिमंडळ विस्तारातील यादी अपडेट करण्यास माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विसरलेले दिसते. त्यातच या यादीतील मंत्र्यांची काही खाती ही विस्तारातील मंत्र्यांना देण्यात आली आहेत. परिणामी या संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांची फसगत होत आहे. (प्रतिनिधी)या मंत्र्यांना वगळलेमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संकेतस्थळावर सध्या केवळ आठ कॅबिनेट मंत्री आणि दोन राज्यमंत्र्यांचा समावेश असलेली यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात १० आमदारांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांचे खातेवाटपही झाले. त्यास आता १४ दिवस लोटले असताना, या मंत्री आणि त्यांचे खाते याबाबतची यादी या संकेतस्थळावर उपलब्ध नाही. यामध्ये गिरीश बापट, गिरीश महाजन, दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम, एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, बबन लोणीकर, डॉ. दीपक सावंत, राजकुमार बडोले या कॅबिनेट मंत्र्यांसह राम शिंदे, विजय देशमुख, संजय राठोड, दादाजी भुसे, विजय शिवतारे, दीपक केसरकर, राजे अंबरिशराव आत्राम, रवींद्र वायकर, डॉ. रणजित पाटील, प्रवीण पोटे-पाटील या राज्यमंत्र्यांना यादीत स्थान देण्यात आलेले नाही.
विस्तारातील मंत्र्यांची ‘माहिती’ विसरले!
By admin | Published: December 19, 2014 12:50 AM