मुंबई - शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सत्ता व जागावाटपात समान वाटप असा युतीचा फॉर्म्युला ठरला असल्याचा दावा केला होता. मात्र युतीत असा कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याचा खुलासा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. त्यामुळे महाजनांच्या या दाव्यामुळे खासदार राऊत तोंडघशी पडले आहे. नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमाची जागा निश्चित करण्यासाठी आलेले महाजन यावेळी बोलत होते.
विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीतच ठरला असल्याचा दावा राऊत यांनी केला होता. सत्तेत आणि जागावाटपात समान वाटप असा फॉम्युला भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर असताना ठरला असल्याचे राऊत म्हणाले होते.
मात्र अद्याप युतीचा फॉर्म्युला ठरलाच नसल्याने, समान जागावाटपाचा विषयच येत नसल्याचे महाजन म्हणाले. दोन्ही पक्षातील पक्षश्रेष्ठीं जे ठरवतील तोच फॉर्म्युला अंतिम रहाणार आहे. त्यामुळे उगाच कुणी त्यात मत मांडू नये, असा टोला सुद्धा महाजन यांनी राऊत यांना लगावला.
आगामी विधानसभा निवडणुकीबाबत युतीचा कोणताही फॉर्म्युला अजून ठरला नाही. मात्र दोन्ही पक्ष युतीसाठी सकारात्मक आहेत. त्याचबरोबर घटक पक्षातील नेत्यांसोबत सुद्धा चर्चा सुरु आहे. तेसेच भाजप-शिवसेनेत काही जागांबाबत मतभेद असले तरी, त्यावर लवकरच तोडगा निघेल. असेही महाजन यावेळी म्हणाले.