तब्बल साडेतीन कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याच्या आरोपावरुन उद्धव ठाकरे शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी, तसेच त्यांची पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम या तिघांविरुद्ध आज सकाळी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून ही कारवाई करण्यात आली असून, या विभागाचे उपअधीक्षक सुशांत चव्हाण अधिक तपास करत आहेत.
सदर प्रकरणावर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सगळीकडेच धाडी पडत आहेत. सगळीकडेच नोटा सापडताय. खोके-खोके म्हणणाऱ्यांच्याच घरी खोके सापडत आहेत. त्यात आमचा काय दोष आहे?, असं गुलाबराव पाटील म्हणाले. कारवाया करणे हे त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना माहीत असतं. त्यानुसार ते संबंधित ठिकाणी छापा टाकतात, असं गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
जवळपास सव्वा वर्षाहून अधिक काळ आमदार साळवी यांची चौकशी अलिबाग लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून सुरू आहे. यात त्यांची पत्नी अनुजा, मुलगा शुभम, त्यांचे भाऊ दीपक तसेच पुतण्या अथर्व याचीही चौकशी लाचलुचपत विभागाकडून करण्यात आली आहे. चालू महिन्यातच सर्वांचे जबाब नोंदवण्याचे काम संपले आहे. आमदार साळवी तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या नावे असलेल्या मालमत्तेची कागदपत्रे तपासण्यात आली. त्यानंतर आता गुरुवार १८ रोजी सकाळी ९:०८ वाजता आमदार राजन साळवी, पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम यांच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आमदार राजन साळवी, अनुजा साळवी, शुभम साळवी (सर्व रा. साहेब बंगला, एमएसईबी ऑफिसच्या बाजूला, खालची आळी, रत्नागिरी) यांच्याकडे रत्नागिरी शहर हद्दीत व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ऑक्टोबर २००९ ते ०२ डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये असलेले ज्ञात उत्पन्न, खर्च व मालमत्ता विचारात घेण्यात येऊन, त्यांच्या ताब्यात ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त एकूण ३,५३,८९,७५२/- रुपये इतकी अपसंपदा म्हणजेच ११८.९६ % अपसंपदा संपदित केली असल्याचे स्पष्ट झाले आहे व त्याबाबतचा समाधानकारक खुलासा त्यांनी सादर केला नाही. या प्रकरणाची सर्व कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनील लोखंडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनिल येरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीचे उपअधीक्षक सुशांत चव्हाण करत आहेत.
उद्धव ठाकरेंचा तातडीने राजन साळवींना फोन
एसीबीच्या कारवाईवर राजन साळवींची प्रतिक्रिया आली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिल्याने आमची चौकशी सुरु झाली आहे. आम्ही कसे आहोत हे जनतेला माहिती आहे. माझ्या पाठिशी माझे मतदार आणि संपूर्ण जिल्हा आहे. हे अधिकारी कालच रत्नागिरीत दाखल झाले होते. मी तुरुंगात गेलो तरी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही, असे साळवी म्हणआले. तसेच चौकशीचे परिणाम काय होऊ द्या, सामोर जाण्याची माझी तयारी आहे. माझ्या पक्षावर पूर्ण विश्वास आहे, असे राजन साळवी म्हणाले. तसेच उद्धव ठाकरेंनी मला तातडीने फोन केला. त्यांनी विचारपूस केली. राजन तुझ्या पाठिशी संपूर्ण महाराष्ट्र आहे. याचा मला अभिमान आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.