"अर्थ खात्यासारखे नालायक खाते नाही"; मंत्री गुलाबराव पाटील यांचे धक्कादायक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 06:54 PM2024-09-06T18:54:33+5:302024-09-06T18:56:03+5:30

मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये बोलताना अर्थ खात्याविषयी वादग्रस्त विधान केलं आहे.

Minister Gulabrao Patil has made a controversial statement about the Finance Department | "अर्थ खात्यासारखे नालायक खाते नाही"; मंत्री गुलाबराव पाटील यांचे धक्कादायक विधान

"अर्थ खात्यासारखे नालायक खाते नाही"; मंत्री गुलाबराव पाटील यांचे धक्कादायक विधान

Gulabrao patil : विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना महायुतीमध्ये स्थानिक पातळीवर वादाच्या ठिणग्या पडत असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन महायुतीमध्ये श्रेयवाद सुरु असल्याचीही चर्चा सुरु आहे. अशातच आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या एका विधानामुळे नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. महायुतीतील भाजप आणि शिंदे गटातील नेते सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधत आहेत. त्यात आता गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विधानाने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

जळगाव येथे शनिवारी हातपंप आणि वीजपंप दुरुस्ती आणि देखभाल कर्मचारी संघटनेच्या वतीने सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी बोलताना अर्थ खात्यासारखे नालायक खाते नाही असं विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थखात्यावर गुलाबराव पाटील यांनी निशाणा साधल्यामुळे आता राजकीय वर्तुळात या वक्तव्याची चर्चा सुरु झाली आहे.

"अर्थ खात्यासारखे नालायक खाते नाही. अनेक वेळा नकाराचा शेरा मिळून फाईल परत येत असे. पण पाठपुराव्यामुळे आमचे काम झाले. दोन अडीच महिन्यात येणारे विघ्न दूर करण्यासाठी प्रयत्न करा. स्वार्थाबरोबर परमार्थही साधावा लागतो," असं विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं.

"सरकारमधे राज्यमंत्र्याला फारसे काही करुन घेता येत नाही. उद्धव ठाकरे सरकारमध्ये असताना पाणी पुरवठा खाते मागितले नव्हते. मंत्र्याने आपल्या खात्यातील कर्मचाऱ्यांना खुश ठेवले तरच चांगले काम होऊ शकते. आमदार जर मंत्री होऊ शकतो तर, उपअभियंत्यास वरची जागा का मिळू नये, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मी माझ्या खात्यातील अनेकांना पदोन्नती दिली. माझ्यासारखा पदोन्नती देणारा दुसरा कोणी नसेल. मी देवदूत नाही. गरिबी जवळून पाहिली आहे. कष्टकऱ्यांचे पैसे जे खातात, त्यांचे हात लुळे झाल्याशिवाय राहणार नाहीत. जनतेला पाणी पाजण्याचे पुण्याचे काम मला मिळाले. आयुष्यात आता लोकांसाठीच काम करायचे आहे," असेही मंत्री गुलाबराव पपाटील म्हणाले.
 

Web Title: Minister Gulabrao Patil has made a controversial statement about the Finance Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.