Kolhapur K.P. Patil : कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसणार आहे. कोल्हापुरमधील माजी आमदार के.पी. पाटील हे महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राधानगरी भुदरगड तालुक्याचे माजी आमदार के. पी. पाटील यांची महाविकास आघाडीची सलगी वाढत आहे. अशातच के . पी. पाटील हे अध्यक्ष असलेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागांनी छापा टाकला. के. पी. पाटील यांच्या कारखान्यावर केलेल्या कारवाईचा मंत्री हसन मुश्रीफ यांनी निषेध केला आहे. महाविकास आघाडीत जात असल्याने कारवाई होत असल्यास निषेध करतो अशा शब्दात मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त केली. के पी पाटील यांच्या कारखान्यावर छापा टाकल्यामुळे हसन मुश्रीफ यांनी उत्पादन शुल्क मंत्रालयाला खडेबोल सुनावले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बिद्री सहकारी साखर कारखान्यावर राज्य उत्पादन उत्पादन शुल्क विभागाकडून झाडाझडती करण्यात आली. त्याआधी दोन दिवसांपूर्वी कारखान्याचे अध्यक्ष के.पी.पाटील यांच्या मविआ प्रवेशाची चर्चा रंगली होती. यानंतर आता महायुती सरकारचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. हा कारखाना ६५ हजार सभासदांच्या मालकीचा असल्याचे म्हणत सरकारलाच सुनावलं आहे.
"या कारवाईचा मी निषेध करतो. महाविकास आघाडीकडे के पी पाटील जात असल्याने त्यांच्या घरावर ईडी, सीबीआयचे छापे घालण्यात आले. ६५ हजार सभासदांच्या मालकीच्या कारखान्यावर अशा प्रकारची कारवाई करणे हे मला आवडलेले नाही. मी याचा तीव्र निषेध करतो. हा कारखाना के पी पाटील यांच्या मालकीच्या नसून ६५ हजार सभासदांच्या मालकीचा आहे," असे मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.
दुसरीकडे, के.पी. पाटील यांनी नुकतीच राज्य सरकार आणि महायुतीवर सडकून टीका केली होती. अशातच आता ते अजित पवार यांची साथ सोडून निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत जाणार असल्याची चर्चा आहे. कारण काही दिवसांपूर्वी मविआने काढलेल्या मोर्चातही ते सहभागी झाले होते. तसेच कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज हे एका कार्यक्रमासाठी राधानगरी-भुदरगड मतदारसंघात गेले तेव्हा के.पी. पाटील यांनी त्यांचे स्वागत केले होते. त्यामुळे के पी पाटील हे महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतक कार्यकर्त्यांनी के पी पाटील यांना शरद पवार यांच्या सोबत जाण्याची विनंती केली होती. मात्र बिद्री साखर कारखान्याच्या काही परवानग्यांसाठी आपण सत्तेसोबत जात असल्याचे के पी पाटील यांनी म्हटलं होतं.