मुंबई - माझ्याबाबत विरोधकांनी जे आरोप केलेत ते वस्तूस्थितीला धरून नाही. विरोधक ज्या प्रकरणावरून माझ्यावर आरोप करतायेत त्यात कोर्टाने माझी निर्दोष मुक्तता केली आहे. देशात सर्वोच्च व्यवस्था ही न्यायव्यवस्था आहे. त्यामुळे विरोधक काय म्हणतात याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. विरोधकांनी वस्तूस्थिती माहिती करून घ्यावी. ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांच्यावर हक्कभंग आणि अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचा इशारा मंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांना दिला आहे.
जयकुमार गोरे म्हणाले की, ज्या घटनेबाबत विरोधक बोलतायेत ती २०१७ साली घडली, त्यावर २०१९ मध्ये कोर्टाने निकाल सुनावला आहे. यात कोर्टाने मला निर्दोष मुक्त केले आहे. या देशात लोकशाही आहे, लोकशाहीत सर्वोच्च न्यायालय आहे. कोर्टाच्या निकालाला ६ वर्ष झालीत. ६ वर्षांनी हा विषय समोर आला. आपण हा विषय कधी आणावा, कुठल्या वेळी काय बोलावे यावर राजकीय लोकांनी काही मर्यादा ठेवली पाहिजे. ज्या वडिलांनी माझ्यासाठी संघर्ष केला, मला शिकवलं, वाढवले आणि इथपर्यंत आणलं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अस्थी विसर्जनही करू दिले नाही. इतक्या खालच्या पातळीचं राजकारण विरोधकांनी केले असा आरोप त्यांनी केला.
तसेच मी जबाबदार पदावर काम करतो. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणेही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे या घटनेवर कोर्टाने निकाल सुनावला आहे. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी माझ्यावर आरोप केलेत त्या प्रत्येकावर आजच मी सभागृहात हक्कभंग आणणार आहे. संबंधितांवर माझ्या बदनामी प्रकरणी अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार आहे. जर मी महिलेला त्रास दिला असेल तर पोलिसांनी चौकशी करावी. चौकशी करून जो कुणी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करावी असंही जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.
संजय राऊतांनी केला होता आरोप?
सातारचे जयकुमार गोरे यांच्याबाबत अत्यंत गंभीर, स्वारगेटला जो प्रकार घडला तसाच हा प्रकार आहे. भाजपाचे मंत्री, देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत लाडके जयकुमार गोरे यांच्याबाबत हे समोर येतोय. शिवकाळातील सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्याने छळ आणि विनयभंग केल्याचं समोर आले. ही महिला पुढच्या काही दिवसात विधानभवनासमोर उपोषणाला बसणार आहे असा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केला होता.