अनिकेत घमंडी, डोंबिवलीराज्यातील मुंबई, ठाणे महापालिकांच्या निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा, याकरिता भाजपा आमदारांचा आग्रह असून ठाणे जिल्ह्याचा विचार करता संजय केळकर, रवींद्र चव्हाण व किसन कथोरे यांच्यात मंत्रीपदाकरिता रस्सीखेच सुरू आहे.भाजपा आमदारांत नाराजी दूर केली नाही तर महापालिका निवडणुकीला सामोरे जाणे पक्षाला कठीण जाणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा ठाणे जिल्ह्यातील भाजपा वर्तुळात सुरू झाली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत भाजपाची ताकद वाढवण्याची जबाबदारी संजय केळकर व शहराध्यक्ष संदीप लेले यांच्यावर सोपवलेली आहे. सध्या ठाणे महापालिकेत भाजपाचे केवळ आठ सदस्य आहेत. शिवसेनेचे नेते व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताकदीचा मुकाबला केळकर-लेले जोडगोळीला करायचा आहे. त्यामुळे आपल्याला मंत्रीपद मिळावे, अशी केळकर यांची इच्छा असल्याचे त्यांच्या निकटवर्तीय वर्तुळातून समजले. मात्र, केळकर हे मास लीडर नसल्याने त्यांना मंत्री करून पक्षाला किती लाभ होणार, असा सवाल त्यांचे विरोधक करीत आहेत.कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी भाजपाची ताकद वाढवली. मागीलवेळी जेमतेम नऊ नगरसेवक असलेल्या भाजपाचे ४२ नगरसेवक सभागृहात आहेत. त्यामुळे त्याआधारे आपल्याला मंत्रीपद मिळावे, ही चव्हाण यांची अपेक्षा आहे. कल्याण-डोंबिवलीतील चव्हाण यांचे संघटन कौशल्य पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना कुडाळ नगरपरिषदेत कमळ फुलवण्यासाठी माजीमंत्री नारायण राणे यांच्याशी दोन हात करण्याकरिता धाडले होते. मात्र, तेथे काँग्रेसने बाजी मारली असून भाजपाला १४ पैकी अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यामुळे चव्हाण यांच्या मंत्रीपदाच्या आकांक्षेला काहीसा धक्का बसल्याचे बोलले जाते.आ. किसन कथोरे हेही मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. मुरबाड व ग्रामीण भागात राष्ट्रवादीचे वर्चस्व त्यांनी मोडीत काढल्याने त्यांचा मंत्रीपदाचा दावा भक्कम आहे. मात्र, त्यांना नुकतीच प्रदेश भाजपाची जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्रीपद देताना पक्षाने ‘एक व्यक्ती, एक पद’ हा निकष लावला तर कथोरे यांना पक्षातील पदावर समाधान मानावे लागेल. अन्य पक्षातून आलेल्या व्यक्तींना थेट मंत्रीपद देण्यास पांडुरंग फुंडकर व तत्सम ज्येष्ठ नेत्यांचा विरोध आहे.आ. नरेंद्र पवार हे दुष्काळी भागात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या मंत्रीपदाकरिता दानवे यांना आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागेल. मुंबई मनपाबरोबर ठाण्याची निवडणूक असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांचे सर्वाधिक लक्ष हे मुंबईवर राहिल्यास ठाण्याची जबाबदारी समर्थपणे हाताळण्यासाठी एका आमदाराला मंत्रीपद देऊन ताकद द्यावी लागेल. आता फडणवीस यांची पसंती कुणाला, त्याची चर्चा आहे.
मंत्रीपदी केळकर, चव्हाण की कथोरे?
By admin | Published: April 19, 2016 2:12 AM