मुंबई- राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने प्रस्तावित केलेल्या पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या परीक्षा आराखड्याला मंजुरी दिली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी आज (४ जून) राज्यपालांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन राज्यपालांना आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे तयार करण्यात आलेला वैद्यकीय परीक्षा घेण्याबाबतचा विस्तृत आराखडा सादर केला. विद्यापीठाने परीक्षा घेण्यासंदर्भात केलेल्या नियोजनाचे यावेळी राज्यपालांनी कौतुक केले. राज्यपालांना दिलेल्या पत्रामध्ये अमित देशमुख यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षा घेण्यासंदर्भात तीन पर्याय तयार केले असल्याचे सांगितले. पहिल्या प्रस्तावानुसार परिस्थिती अनुकूल असल्यास सर्व लेखी परीक्षा १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येतील. कोरोना परिस्थितीमुळे या कालावधीत परीक्षा घेणे शक्य न झाल्यास लेखी परीक्षा १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येईल. उपरोक्त दोन्ही पर्यायांनुसार परीक्षा होऊ न शकल्यास आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे केंद्रीय वैद्यकीय परिषदेचे मार्गदर्शन घेण्यात येईल व त्यानुसार ऑनलाईन किंवा इतर पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेण्यात घेतील. आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे परीक्षांचा आराखडा तयार करताना सर्व संबंधित घटकांशी, माजी कुलगुरू, प्रकुलगुरुंशी तसेच नियामक संस्थांशी विचारविनिमय केल्याचे अमित देशमुख यांनी राज्यपालांना सांगितले. यासंदर्भात आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परिचर्या परिषद, वैद्यकीय परिषद तसेच इतर केंद्रीय संस्थाशी देखील सल्लामसलत केल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रस्तावाला राज्यपालांनी दिलेल्या मंजुरीबाबत विद्यापीठाच्या कुलगुरुंना देखील स्वतंत्रपणे कळविण्यात आले आहे.
हेही वाचा
संशयास्पद मृत्यूपूर्वी कोरोना संक्रमित होता जॉर्ज फ्लॉईड, रिपोर्टमधून खुलासा
राज्यसभा निवडणुकीआधी काँग्रेसला धक्का; गुजरातच्या दोन आमदारांचा राजीनामा
चीनच्या 'या' मोठ्या मोबाइल कंपनीकडून भारताची फसवणूक, तुम्हालाही घातला जाऊ शकतो गंडा?
PoKमध्ये बौद्धांच्या वारशाला धक्का; गिलगिट-बाल्टिस्तान रिकामी करा; भारताचा पाकला कडक इशारा
Cyclone Nisarga: चक्रीवादळाने दिशा बदलल्याने मुंबई अन् ठाण्यातील मच्छीमारांसाठी धोका टळला