योगेश पांडे, नागपूरविधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान संपूर्ण राज्य सरकार नागपूर मुक्कामी आहे. याचे निमित्त साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भाजपाच्या सर्व मंत्री व आमदारांचे ‘बौद्धिक’ घेण्यात येणार आहे. १७ डिसेंबर रोजी रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात हा उद्बोधन वर्ग होईल. या वर्गाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित राहतील, अशी माहिती एका वरिष्ठ मंत्र्याने नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर दिली.मागील वर्षी संघाकडून आमदारांसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्यांना संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून संघ विचारधारा आणि सामाजिक कार्याबाबत बौद्धिक घेण्यात आले होते. परंतु त्या वेळी सरसंघचालकांसोबत आमदारांची भेट होऊ शकली नव्हती. यंदादेखील हिवाळी अधिवेशनानिमित्त राज्यभरातील आमदार तीन आठवडे नागपूरमध्ये आहेत. त्यामुळे संघभूमीत सरसंघचालकांचे मार्गदर्शन मिळावे अशी अनेकांची इच्छा आहे. आमदार व मंत्री रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात जाऊन आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतील व त्यानंतर सर्वांना संघ पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येईल.>> मार्गदर्शन कोण करणार, याबाबत गुप्तताया उद्बोधन वर्गात संघाकडून नेमके कोण मार्गदर्शन करणार याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. मागील वर्षी माजी महानगर संघचालक डॉ. दिलीप गुप्ता यांनी मार्गदर्शन केले होते. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह भय्याजी जोशी, सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे हे सध्या नागपुरातच आहेत. त्यामुळे संघाचे जेष्ठ पदाधिकारी हा वर्ग घेतील की स्थानिक पदाधिकाऱ्यांसमोरच मंत्री-आमदार उपस्थित राहतील याबाबतीत संघाकडून मौन साधण्यात आले आहे.संघ विचार आणि अपेक्षांवर भरभाजपाच्या एखाद्या मंत्र्याने कुठलीही गैरवर्तणूक केली तर ‘स्वयंसेवक’ बिघडला, अशी टीका होते. शिवाय विविध घटनांमुळे मंत्र्यांवर ताशेरेदेखील ओढण्यात येत आहेत. सरकारकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अशा स्थितीत आमदार व मंत्र्यांचे नेमके आचरण कसे हवे आणि जनताहितासाठी कुठल्या बाबींमध्ये पुढाकार घ्यायला हवा, यावर उद्बोधन वर्गाचा भर राहणार आहे. शिवाय संघाची विचारधारा आणि अपेक्षा याबाबतदेखील ‘बौद्धिक’ घेण्यात येईल, अशी महिती सूत्रांनी दिली आहे.
मंत्री, आमदारांचे संघ घेणार ‘बौद्धिक’
By admin | Published: December 11, 2015 2:25 AM