काँग्रेसच्या बैठकीत नाराजीनाट्य? मंत्री नितीन राऊत आले अन् लगेच माघारी परतले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 04:52 PM2022-01-27T16:52:13+5:302022-01-27T16:52:55+5:30
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती
मुंबई – राज्यातील महाविकास आघाडीत नाराजी असल्याच्या बातम्या सातत्याने येत असतात. अलीकडेच काँग्रेस मंत्री अमित देशमुख यांनी त्यांच्या खात्याला निधी कमी मिळत असल्याची खंत बोलून दाखवली होती. यातच बुधवारी झालेल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत नाराजीनाट्य पाहायला मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. या बैठकीला आलेले नितीन राऊत काही वेळातच मागे परतल्याने राऊत नाराज असल्याची कुजबूज सुरु झाली.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी नितीन राऊत दाखल झाले परंतु निमंत्रण नसल्याने ते पुन्हा माघारी परतले. वांद्रे येथील एमसीए येथे हा प्रकार घडला. एच के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
राज्यात झालेल्या नगर पंचायतीच्या निकालानंतर त्याचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसनं ही बैठक घेतली होती. त्यावेळी नितीन राऊत बैठकस्थळी आले. परंतु काही वेळात राऊत बैठकीच्या ठिकाणाहून बाहेर पडले. त्यावरुन राऊत नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र राऊत बैठकीला उपस्थित राहण्यासाठी नव्हे तर प्रभारी एच के पाटील यांना भेटायला आल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. पुढील काही दिवसांत काँग्रेस मंत्र्यांची आणि कार्याध्यक्षांची बैठक घेणार आहे.
दरम्यान, नितीन राऊत नाराज आहेत का? या पत्रकारांच्या प्रश्नावर मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, काँग्रेस वरिष्ठ नेत्यांची बैठक होती. त्यात विधिमंडळ पक्षाचा नेता असल्याने मी या बैठकीला हजर होतो. प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले होते. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशील कुमार शिंदे हजर होते. मला नितीन राऊत भेटले. काही निकषाने मर्यादित नेत्यांना बैठकीला बोलावलं होतं. नितीन राऊत नाराज नाहीत. निधी वाटपाबाबत मंत्र्यांनी जे पत्र दिलं आहे त्याबाबत आम्ही दखल घेतली आहे. मंत्री आपापल्या विभागांसाठी निधी मागतो तो द्यावा लागतो. पुढील आठवड्यात महाविकास आघाडी समन्वय समितीची बैठक होईल असंही थोरातांनी सांगितले.